जव्हारमधील संमेलनपूर्व संमेलनात आदिवासी संस्कृतीचे दर्शन
ठाणे जिल्ह्य़ात मोठय़ा संख्येने राहणाऱ्या आदिवासींच्या कला आणि साहित्याला प्रोत्साहन मिळावे, शहरवासीयांना त्याचे दर्शन घडावे म्हणून साहित्य संमेलनात विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात जव्हार तालुक्यात संमेलनपूर्व साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्य़ाचे भूमिपुत्र आगरी, कोळी, आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व ठसठशीतपणे मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
ठाणे-पालघर जिल्ह्य़ात विखुरलेल्या आदिवासी समाजात चित्रकला, नृत्य, काव्य आदी कलांची जोपासना केली जाते. त्यातली काव्य परंपरा ही बरीचशी मौखिक स्वरूपाची आहे. हे वाङ्मय छापील स्वरूपात आणण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांचे सण, चालिरीती, पोशाख आदींचे दर्शन घडणार आहे. आदिवासी समाजातील कला परंपरा, बदलत्या जगातील त्यांचे स्थान, त्यांचे प्रश्न आणि उपाय याविषयी चर्चा, परिसंवाद संमेलनात होतील. डोंबिवलीतील साहित्य संमेलनातही त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, म्हणून वाहन व्यवस्था केली जाईल.
हे आदिवासी संमेलन नेमके कसे असावे याविषयी साहित्यिक आणि तज्ज्ञंमंडळींसोबत विचारविनिमय केला जात आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी लोकसत्ता ठाणेला दिली. या संमेलनाची आखणी जव्हार भागातच व्हावी अशा सूचना संमेलन समितीपुढे करण्यात आल्या होत्या. त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
याआधीही हा प्रयोग
ठाण्यातील संमेलनाच्या वेळीही जव्हार येथे आदिवासी साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. भारतीय शिक्षण मंडळ संस्थेचे संस्थापक अनिल पाठक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.