ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी आणलेल्या एका आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देत पळ काढल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. दरम्यान, या आरोपीने घरी फोन करून त्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. १४ वर्षांचा कारावास भोगावा लागणार या भीतीने त्याने पळ काढल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर येथे राहणाऱ्या संतोष आंबोळकर (४२) याला काही दिवसांपूर्वी ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली. मात्र त्याच्या काही तपासण्या करायच्या असल्याने भाईंदर पोलिसांनी त्याचा पुन्हा ताबा घेतला. दरम्यान, २७ सप्टेंबरला त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. रुग्णालयातील गर्दीचा फायदा घेत त्याने पोलिसांच्या हाताला झटका देत तिथून पळ काढला. त्यानंतर भाईंदर पोलिसांनी ठाणे एसटी डेपो आणि रेल्वे पोलिसांना संपर्क साधला. तसेच त्याच्या शोधासाठी त्या ठिकाणीही गेले.

मात्र तो हाती लागला नाही. दरम्यान, पोलिसांनी संतोष याच्या पत्नीशी संपर्क साधून संतोषचा फोन आल्यास पोलिसांना कळविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर संतोषने त्याच्या पत्नीला संपर्क करून भाईंदर रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती दिली. त्याच्या पत्नीने तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी भाईंदर रेल्वे स्थानकातून संतोषला ताब्यात घेतले.