किशोर कोकणे

गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या संकेतस्थळांमुळे पारंपरिक बाजारपेठांचा आर्थिक कणा मोडला असताना या आव्हानाला तोंड देण्यासाठी ठाण्यातील राम मारुती मार्गावरील व्यापारी एकवटले आहेत. पूर्वीचा ग्राहक आणि तरुण-तरुणींना या पारंपरिक बाजाराकडे आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली असून त्याद्वारे ठरवून दिवाळी खरेदीवर सवलती, लकी ड्रॉ यासारख्या योजना पुढे आणल्या जात आहेत. एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी ग्राहकांना जोडण्यासाठी व्यापारी एकमेकांशी सल्लामसलत करूनच अशाच योजना आखत आहेत.

ठाण्यातील जुन्या बाजारांमधील मरगळ दूर व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने घोडबंदरहून या बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांसाठी दिवाळीच्या काळात विशेष बस सेवा सुरू केली आहे. गेल्या वर्षांपासून बससेवेची ही योजना आखण्यात आली. या बसचा काही प्रमाणात फायदा आम्हाला मिळत आहे, असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घर बसल्या वस्तूंची खरेदी आणि ७० ते ८० टक्क्यांपर्यंतच्या सवलती यामुळे ग्राहकांचा कल गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन बाजारपेठेकडे दिसून आला आहे.

याचा सर्वाधिक परिणाम पारंपरिक बाजारपेठांवर दिसून आला आहे. ऑनलाइन बाजारपेठेमुळे ग्राहक पारंपरिक बाजारपेठेत फिरकत नाही, शिवाय मंदीचे मळभ असल्याने गेल्या काही महिन्यांपासून या बाजारांमध्ये मरगळ दिसू लागली आहे. ही मरगळ झटकण्यासाठी नौपाडा येथील राम मारुती मार्गावरील १३० व्यापारी एकत्र आलेले आहेत. वर्षभरापूर्वी या मार्गावरील व्यापाऱ्यांनी राम मारुती रोड फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लकी ड्रॉ, सवलती देण्यास सुरुवात केली आहे. तसेच राम मारुती मार्गावरील संस्थेमध्ये जितकी दुकाने आहेत.

त्यांच्या एकत्रित जाहिराती वृत्तपत्रांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सर्व छोटय़ा-मोठय़ा व्यापाऱ्यांची एकत्र जाहिरात होऊ लागली आहे. ऑनलाइन वस्तू विक्री संकेतस्थळांवर ज्याप्रमाणे वस्तू शोध (सर्च) केला जातो. त्याप्रमाणे या जाहिरांतीमध्ये कोणती वस्तू कोणत्या दुकानात मिळेल याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकही आकर्षिले जात आहे. यासोबतच या संपूर्ण रस्त्यावर कंदील, विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. या वर्षी दिवाळीत पडलेल्या पावसामुळे बाजारपेठेवर एक दिवस परिणाम झाला. मात्र, त्यानंतर दोन दिवस वातावरण चांगले राहिल्याने दिवाळीत ग्राहकांनी पुन्हा एकदा दुकानांमध्ये येण्यास सुरुवात केल्याचे संस्थेचे अध्यक्ष रसिक छेडा यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन बाजारामुळे आलेली मरगळ आता झटकली जात असून या वर्षी दिवाळीत प्रत्येक दुकानदाराला सुमारे १५ ते २० टक्के फायदा झालेला आहे. दररोज या बाजारपेठेत सुमारे १ हजार ग्राहक भेट देत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

घोडबंदरच्या ग्राहकांसाठी टीएमटी बस

दिवाळीनिमित्ताने घोडबंदर येथील ग्राहकांना थेट बाजारपेठेत येता यावे यासाठी टीएमटी बस ठाणे महापालिकेकडून सुरू करण्यात येते. घोडबंदर ते राम मारुती मार्गापर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात येते. त्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना फायदा होत असल्याचे टीएमटीचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी सांगितले.

ऑनलाइन बाजाराचा सर्वाधिक फटका सामान्य व्यापाऱ्यांना बसला. त्यामुळे आम्ही राम मारुती रोड फाऊंडेशन स्थापन केली. येत्या काळात ऑनलाइन बाजाराचा फटका आणखी बसू नये म्हणून आम्ही ही तयारी केली आणि त्यात यशही मिळत आहे.

– रसिक छेडा, अध्यक्ष, राम मारुती रोड फाऊंडेशन.