डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावर मेट्रो मार्गाची कामे सुरू असली तरी आवश्यक त्या ठिकाणी वाहन कोंडी होणार नाही यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करा. उलट मार्गिकेतून येणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर करा. अरूंद रस्त्यांच्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ ठेऊन तेथे कोंडी होणार नाही यासाठी काळजी घ्या. अशाप्रकारे येत्या काही दिवसात कल्याण शिळफाटा रस्ता वाहन कोंडीमुक्त होईल यादृष्टीने प्रयत्न करा, असे निर्देश कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी गुरूवारी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडी हा नियमित चर्चेचा विषय झाला आहे. या रस्त्याचे कोट्यवधी रूपये खर्च करून रूंदीकरण, सीमेंट काँक्रिटीकरण करूनही हा रस्ता गेल्या वर्षापासून मेट्रो मार्गाच्या कामांमुळे वाहतूक कोंडीत अडकत आहे. या रस्त्यावरील सततच्या वाहन कोंडीने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. या कोंडीवरून प्रवासी, या रस्त्यालगतची गावे, पलावा वसाहतींमधील रहिवासी लोकप्रतिनिधी, शासनाला दोष देत आहेत.
शिळफाटा रस्त्यावर मानपाडा, संदप, रुणवाल गृहसंकुल प्रवेशव्दार, नेतिवली, पत्रीपूल, काटई नाका, पलावा चौक अलीकडे नियमित वाहतूक कोंडी होते. ग्रामीण भागातून आलेले काही रस्ते शिळफाटा रस्त्याला जोडतात, काही गृहसंकुलांमध्ये जातात. याठिकाणी वळण मार्गावर दररोज वाहन कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी विनाविलंंब आवश्यक उपाययोजना करा, असे निर्देश आमदार राजेश मोरे यांनी वाहतूक अधिकाऱ्यांना दिले.
पलावा येथील लोढा शाळेतील सभागृहात वाहतूक, मेट्रो, महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आमदार मोरे यांनी बोलविली होती. या बैठकीला वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, पालिकेचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता मुक्तेश वाडकर, डोंबिवली विधानसभा शहर सचिव संतोष चव्हाण, विभागप्रमुख विजय भाने उपस्थित होते. या बैठकीत शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. ही कोंडी लवकर लवकर सुटेल. प्रवाशांना मोकळ्या रस्त्यावरून प्रवास करता येईल यादृष्टीने प्रभावी काय उपाययोजना करता येतील यादृष्टीने चर्चा करण्यात आली.
वाहतूक अधिकाऱ्यांच्या सूचना ऐकून घेतल्यावर आमदार राजेश मोरे यांनी शिळफाटा रस्त्यावरील जड अवजड वाहनांवर नियंत्रण आणा. त्यांना नेमून दिलेल्या वेळेत ही वाहने धावतील यासाठी प्रयत्नशील राहा. उलट मार्गिकेतून वाहने चालविणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करा. शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भंगार, बंद पडलेल्या वाहनांना हटविण्याची कारवाई करा.
वाहतूक नियमांसाठी जनजागृती करा. ज्या भागात नियमित कोंडी होते. तेथे नियमित वाहतूक पोलीस तैनात ठेवा, अशा सूचना केल्या. दरम्यान, शिळफाटा रस्त्यालगतच्या बाधित शेतकऱ्यांची मागील तीन वर्षापासून रखडलेली सुमारे ३०० कोटीची भरपाई शासनाने लवकर द्यावी. ही भरपाई बाधित शेतकऱ्यांना मिळाली तर काटई ते देसई दरम्यानचा रूंदीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे, असे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले. या भरपाईसाठी आमदार मोरे यांनी प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
