अंबरनाथ : अंबरनाथ शहरात घडलेली एक हृदयद्रावक घटना ऐकून परिसरातील नागरिक स्तब्ध झाले आहेत. मानसिक तणाव आणि खोल नैराश्याच्या अवस्थेत एका २६ वर्षीय आईने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीला गळफास देऊन स्वतःही आत्महत्या केली. आई-मुलीच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे श्रीकृष्ण नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

बहिणीच्या मुलाच्या मृत्यूचा मानसिक आघात

मृत महिला राजकुमारी या पती अच्छेलाल राजस्वरूप निशाद आणि मुलगी अनुष्का यांच्यासह अंबरनाथ पूर्वेतील श्रीकृष्ण नगर भागात राहत होती. काही दिवसांपूर्वीच राजकुमारी हिच्या उत्तर प्रदेशात राहणाऱ्या लहान बहिणीच्या आठ वर्षीय मुलाचा आजारपणाने मृत्यू झाला होता. या घटनेचा तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. पुतण्याचा मृत्यू सतत तिच्या मनात घर करून राहिला होता. जवळचे लोक सांगतात की, या घटनेनंतर ती वारंवार उदास राहत असे. पती अच्छेलाल यांनी पत्नीच्या या अवस्थेकडे लक्ष देऊन तिला थोड्या दिवसांसाठी माहेरी जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मनःस्थिती ढासळलेली असल्याने तिने तो सल्ला मानला नाही.

घटनेचा उलगडा कसा झाला?

शुक्रवारी रात्री अच्छेलाल हे कामानिमित्त आनंद नगर एमआयडीसीतील कंपनीत गेले होते. नेहमीप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी सकाळी कामावरून घरी परतले. मात्र, घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी बऱ्याच वेळा दरवाजा ठोठावला, पण पत्नीने प्रतिसाद दिला नाही. शंका आल्याने त्यांनी त्वरित शिवाजी नगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता धक्कादायक दृश्य सर्वांच्या नजरेस पडले. पत्र्याच्या लोखंडी अंगलला दोरी बांधून राजकुमारीने प्रथम आपल्या तीन वर्षांच्या चिमुकली अनुष्काला गळफास दिला होता आणि त्यानंतर स्वतःनेही गळफास घेतला होता.

या घटनेनंतर शिवाजी नगर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मुलीच्या मृत्यूबाबत आई राजकुमारीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राजकुमारीच्या आत्महत्येबाबत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

परिसरात हळहळ

आईने आपल्या निरागस चिमुकलीसह अशा प्रकारे जीवन संपवल्याची वार्ता कळताच परिसरात शोककळा पसरली. असे काय झाले की महिलेने इतका टोकाचा निर्णय घेतला, असा प्रश्न शेजारी विचारताना दिसून आले.