ठाणे : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष सोडले असून या निर्णयावर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावातल्या भिकू चौकात बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू आणि शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. स्फोटकांनी भरलेली एक मोटारसायकल तिथे ठेवण्यात आली होती. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली होत. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या काही लोकांवर आरोप करण्यात आले. त्यामध्ये भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, भारतीय लष्करातील ले. कर्नल प्रसाद पुरोहित, आणि इतर काही जणांचा समावेश होता. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि नंतर एनआयए (NIA) ने या सर्व आरोपींना हिंदुत्वाच्या नावाने दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला, असे म्हस्के म्हणाले.

हिंदू समाजाला जगापुढे बदनाम केले

या प्रकरणात न्यायालयात अनेकदा मृत्युदंडाची मागणी करण्यात आली होती. काँग्रेसच्या राजकीय अजेंड्यानुसार “हिंदू दहशतवाद” ही टर्म तयार करण्याचा डाव रचण्यात आला. तपास यंत्रणांवर काँग्रेसने दबाव टाकून निर्दोष हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना आरोपी बनवले. माध्यमांमधून “सॅफ्रॉन टेरर” हे शब्दप्रयोग करून हिंदू समाजाला जगापुढे बदनाम करण्यात आले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी देखील यावेळी खुलासा केला होता की, त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव होता, असे म्हस्के म्हणाले.

दोष नसलेल्या लोकांवर खोटे आरोप लावले

काँग्रेस सरकारने तपास वेगळ्या दिशेने वळवण्यासाठी दबाव टाकला होता. ज्यांचा काहीही दोष नव्हता, अशा लोकांवर खोटे आरोप लावले गेले. त्यांना वर्षानुवर्षे तुरुंगात डांबण्यात आलं. हिंदू धर्माशी दहशतवाद जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो अतिशय चुकीचा आणि दु:खद होता, असे म्हस्के म्हणाले.

म्हणून सर्वांना निर्दोष घोषित केले

तब्बल १७ वर्षांनंतर, मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला आणि सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं की, “या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे ठोस, सुसंगत पुरावे आढळून आले नाहीत. मोटारसायकलवर बॉम्ब लावून स्फोट घडवण्यामागे आरोपींचा सहभाग सिद्ध होऊ शकला नाही.” न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी नमूद केलं की, “ज्यांच्यावर आरोप केले गेले, त्यांच्याविरुद्ध कोणतीही विश्वासार्ह साक्ष किंवा वैज्ञानिक पुरावा सापडलेला नाही.” एनआयएने (NIA) केलेल्या तपासात अनेक त्रुटी आढळल्या. मोटारसायकलची मालकी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडे असल्याचेही सिद्ध झालं नाही. ले. कर्नल पुरोहित यांच्या विरोधात स्फोटकांचा वापर वा कटाची माहिती असल्याचेही काहीही पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने “शंका आणि अपुरे पुरावे यावर आधारित शिक्षा देता येत नाही” असं स्पष्ट करून सर्वांना निर्दोष घोषित केले, असे म्हस्के म्हणाले.

हिंदू कधीच आतंकवादी

ही केवळ एका खटल्याची समाप्ती नाही, तर न्यायव्यवस्थेने हिंदुत्ववादी विचारसरणीशी संबंधित निर्दोष कार्यकर्त्यांवर लावले गेलेले आरोप खोटे ठरवत त्यांना दिलेला न्याय आहे. हा निकाल म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांसाठी मोठा विजय आणि काँग्रेसच्या हिंदूविरोधी षड्यंत्राचा पराभव आहे. अनेक वर्षांपासून बंदिस्त, बदनाम, आणि उपेक्षित ठरवलेल्या निर्दोषांची आज सन्मानपूर्वक मुक्तता करण्यात आली . “हा विजय सत्याचा आहे, हा विजय आपल्या हिंदू धर्माचा आहे.” हिंदू कधीच दहशतवादी असूच शकत नाही असे यामधून सिद्ध झाले, असे म्हस्के म्हणाले.