गणेशोत्सवासाठी १ हजार गाडय़ांचे नियोजन ; एसटीच्या संगणकीय आरक्षणास सुरुवात

दरवर्षी या कालावधीत रेल्वे प्रशासन आणि राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष बसगाडय़ा सोडण्यात येतात.

st bus
(संग्रहीत छायाचित्र)

ठाणे : गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या ठाणे विभागातून एक हजार एक बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. ठाणे, बोरिवली, भाईंदर, कल्याण-डोंबिवली अशा विविध भागांतून या जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी संगणकीय आरक्षण नोंदणीला सुरुवात झाली असून २ जुलैपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सुरू असणार आहे, अशी राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने दिली.

 गणेशोत्सवानिमित्त ठाणे, मुंबई आणि उपनगर परिसरातील कोकणवासीय गावची वाट धरत असतात. दरवर्षी या कालावधीत रेल्वे प्रशासन आणि राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष बसगाडय़ा सोडण्यात येतात. यंदा ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. यासाठी महामंडळाच्या ठाणे विभागाने २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान कोकणात जाण्यासाठी १ हजार १ जादा गाडय़ांचे नियोजन केले आहे. त्यापैकी २८ आणि २९ ऑगस्ट या दोन दिवशी कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता ठाणे विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.  त्यामुळे २८ ऑगस्टला ३२७ आणि २९ ऑगस्टला ५६४ गाडय़ांचे नियोजन ठाणे विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी संगणकीय आरक्षणाला सुरुवात झाली असून २ जुलैपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सुरू असणार आहे. तर सामूहिक आरक्षण नोंदणीला १ जुलैपासून सुरुवात होणार आहे. तसेच ४ ते ९ सप्टेंबर या परतीच्या वाहतूक कालावधीसाठी ७ ते १२ जुलैदरम्यान आरक्षण नोंदणी सुरू होणार आहे.

ठाणे विभागातून बोरीवली, भाईंदर, ठाणे, मुलुंड, भांडुप, कल्याण-डोंबिवली, विठ्ठलवाडी या भागातून महाड, अलिबाग, इंदापूर, चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग या मार्गावर सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाने दिली. या जादा गाडय़ांचे आरक्षण संबंधित आगारातील तिकीट खिडक्या, एसटी महामंडळाचे संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे करता येऊ शकते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Msrtc plans 2000 extra st buses for ganeshotsav zws

Next Story
डोंबिवलीतील शिंदे समर्थक १५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; शिवसेना शाखेतील शिंदे पिता-पुत्रांच्या तसबिरी काढण्यावरुन नाराजी
फोटो गॅलरी