Thane Municipal Corporation : ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) जलवाहीन्यांच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी रात्री हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे एमआयडीसीकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे शहरातील दिवा, मुंब्रा, कळवा आणि वागळे इस्टेटमधील काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यापैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा गुरूवार रात्रीपासून बंद ठेवण्यात येणार असून शुक्रवारी दिवसभरही पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. या कामामुळे गुरूवार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री १२ ते शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी रात्री १२ यावेळेत असा चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ आणि ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये तसेच वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.