अंबरनाथः सोशल मीडियाचा गैरवापर करून एका तरुणीचा पाठलाग करण्याचा आणि तिचे फोटो मॉर्फ करून अश्लील व्हिडीओ तयार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इंस्टाग्राम आयडी dp2211012, akshay22117734, Lawrence_bishnoi_70 आणि दोन मोबाईल क्रमांक धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाज माध्यमांवर फॉलो करणे, मैत्रीसाठी तगादा लावणे असे काही प्रकार करत महिलांना त्रास दिला जात असल्याची काही प्रकरणे गेल्या काही वर्षात समोर आली आहेत. काही आरोपी या प्रकारात गुन्हा करणेपर्यंत मजल मारतात. महिलांचे छायाचित्र समाज माध्यम खात्यावरून घेऊन त्याचा चुकीचा वापर करण्याचे प्रकारही अनेकदा समोर येतात. याविरूद्ध महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. अश्लील चित्रफिती तयार करणे, त्यातून बदनामी करणे असे प्रकारही होत असतात. असाच एक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी वारंवार फिर्यादीच्या इंस्टाग्राम आयडीवर फॉलो करण्यासाठी रिक्वेस्ट पाठविल्या. तसेच सतत मेसेज करून तिचा पाठलाग केला. त्यानंतर, फिर्यादीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील फोटो तिच्या परवानगीशिवाय डाउनलोड करून, संगणक किंवा मोबाइल सॉफ्टवेअरच्या साहाय्याने त्यांचे मॉर्फिंग करण्यात आले. हे बदललेले फोटो वापरून अश्लील व्हिडीओ तयार करून इंटरनेटवर अपलोड केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहे. ही तरूणी अंबरनाथ पूर्वेत वास्तव्यास आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित इंस्टाग्राम आयडी आणि मोबाईल नंबरची तपासणी सुरू केली आहे. सायबर क्राईम तज्ज्ञांच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेतला जात असून, अशा प्रकारच्या ऑनलाइन गुन्ह्यांबाबत नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना गोपनीयता सेटिंग्ज काटेकोरपणे वापरणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारच्या गैरवापराला बळी पडण्याची शक्यता वाढते.
डिजिटल प्लॅटफॉर्मवरील छेडछाड आणि अश्लील सामग्री तयार करण्याचे प्रकार किती गंभीर पातळीवर पोहोचले आहेत, हे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर कडक कारवाईची आवश्यकता आहे.