एका प्लेटमागे १५ ते २० रुपयांची वाढ; अनेक ठिकाणी दोन प्लेट भजी घेण्याची सक्ती
पूर्वा साडविलकर, ठाणे</strong>
किरकोळ बाजारात कांदा १२० रुपये किलो दराने विकला जात असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत असतानाच, आता उपाहारगृहामध्ये कांदा भजीच्या दरात पंधरा ते वीस रुपयांनी वाढ झाल्याने खवय्यांचा हिरमोड झाला आहे. विशेष म्हणजे, दोन प्लेट भजी घेण्याची सक्ती उपाहारगृह चालकांकडून केली जात असून यामुळे कांदा भजीचा खर्च खवय्यांना परवडनेसा झाल्याचे चित्र आहे.
पाच दिवसांपूर्वी किरकोळीत कांद्याची ७५ रुपये किलो दराने विक्री केली जात होती. मात्र, त्यामध्ये आता पुन्हा वाढ झाली असून सद्यस्थितीत किरकोळीत कांद्याची १२० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. कांद्याने शंभरी गाठल्यामुळे उपाहारगृहातील जेवणासोबत दिला जाणारा कांदा हद्दपार झाला असून त्यापाठोपाठ आता उपाहारगृहचालकांनी कांदा भजीच्या दरात पंधरा रुपयांची वाढ केली आहे.
उपाहारगृहामध्ये यापूर्वी २५ रुपये दराने एक प्लेट कांदा भजी विकली जात होती. मात्र, आता खवय्यांना एक प्लेट कांदा भजीसाठी ४० ते ४५ रुपये मोजावे लागत आहेत. एक प्लेट कांदा भजीची विक्री करणे परवडत नसल्यामुळे उपाहारगृह चालकांकडून दोन प्लेट कांदा भजी खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. मात्र, कांदा भजीच्या दरात वाढ झाल्याने आणि दोन प्लेट भजी घेण्याच्या सक्तीमुळे खवय्ये कांदा भजीकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र आहे.
कांद्या आवक सध्या बाजारात कमी होत असल्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होत आहे, अशी माहिती ठाण्यातील कांदा विक्रेते रमेश वर्मा यांनी दिली, तर कांद्याचे दर कमी होईपर्यंत सध्या कांदाभजी विक्री
करणे बंद केले आहे, असे कांदाभजी विक्रेते कुमार पल्लार यांनी सांगितले. कांद्याचे दर वाढल्याने कांदा खरेदी करणे परवडत नाही. कांदाभजीचे दर वाढवून विक्री करणे हे ग्राहकांना परवडणारे नसते. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
कांद्याचे दर चढेच
दिनांक घाऊक किरकोळ
२० नोव्हेंबर ६२ ७५
२१ नोव्हेंबर ६५ ८०
२२ नोव्हेंबर ८० १००
२५ नोव्हेंबर १०० १२०
२६ नोव्हेंबर १०० १२०
(दर रूपये प्रतिकिलो)