पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळेला सुट्टय़ा जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना घरात बसून अभ्यास करता यावा, यासाठी ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या शहरांतील विविध शाळांच्या शिक्षकांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षकांनी विविध अ‍ॅप्लिकेशन्सची आणि संकेतस्थळांची निर्मिती केली असून या माध्यमातून शिक्षक घरी असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देत आहेत. विद्यार्थीही या आधुनिक पद्धतीने शिक्षण घेण्यामध्ये अधिक रुची दर्शवीत असल्याचे शाळेच्या शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने गर्दी टाळण्याचे आवाहन केले असून देशातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी विविध शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासाचे धडे देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेत विद्यार्थ्यांना या सुटीच्या कालावधीत विज्ञान विषयाचे अधिक ज्ञान अवगत व्हावे तसेच त्यांच्यात या विषयाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ‘गुगलवर्ग’ सुरू करण्यात आला आहे. ‘गुगलवर्गा’साठी शाळेने अँड्रॉइड मोबाइल फोनवर उपलब्ध असलेल्या ‘गुगल क्लासरूम’ या अ‍ॅप्लिकेशनची मदत घेतली असून त्यामध्ये शाळेने स्वत:चे वेगळे पेज तयार केले आहे. त्यामध्ये पाच वर्षे वयोगटापासून ते सात वर्षे वयोगटासाठी ‘लिटिल न्यूटन’ या नावाने तर पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सफल’ या नावाने ऑनलाइन वर्ग होत आहेत. या ऑनलाइन वर्गामध्ये विज्ञानाचे प्रयोग तसेच त्या प्रयोगाला अनुसरून प्रश्न समाविष्ट करण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची विज्ञान विषयाची उजळणी होत आहे. सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीच्या २१ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना घरात बसून इंग्रजी विषयाचे धडे मिळावे यासाठी लोकमान्यनगर परिसरातील रा. ज. ठाकूर विद्यामंदिर शाळेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक सुनील चव्हाण हे टीम एक्सिलेंटचे परेश कारंडे यांच्या मदतीने शाळेच्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅप, टिकटॉक तसेच फेसबुक अ‍ॅपच्या माध्यमातून इंग्रजी विषयाचे धडे देत आहेत. या सर्व अ‍ॅपवर त्यांनी स्वतंत्र पेज तयार केले असून या पेजवर रोज पुस्तकाचे टिपण अपलोड केले जात आहेत. तसेच इंग्रजी भाषेविषयी सखोल माहिती देण्यात येत आहे.

विद्यार्थी-शिक्षकांमध्ये ‘झूम’ संवाद

शाळेप्रमाणे विद्यार्थ्यांना घरातही अभ्यासाचे धडे घेता यावे, यासाठी कल्याण येथील बालक मंदिर शाळेतील शिक्षक विलास लिखार हे ‘झूम’ या व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप्लिकेशनची मदत घेत आहेत. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांना थेट संवाद साधता येतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही शंका निर्माण झाली तर या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून ते शिक्षकांशी संवाद साधून त्या शंकांचे निरसण करून घेत आहेत. दररोज एक तास हे प्रशिक्षण वर्ग घेतले जातीत. तर, ठाण्यातील सिंघानिया शाळेत गुगल वर्गाच्या माध्यमातून बालवाडी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वेळापत्रकानुसार वर्ग घेतले जात आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online lessons for students due to school closed zws