ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतुकीचा बोऱ्या; प्रवाशांना नाहक त्रास

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे स्थानकात ओव्हरहेड वाहिनीवर कपडा पडल्याने मंगळवारी सकाळच्या सुमारास ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अखेर वीस मिनिटांच्या कालावधीनंतर विद्युत प्रवाह बंद करून हा कपडा हटवण्यात आला आणि वाहतूक सुरू करण्यात आली. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार झाल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.

ट्रान्स हार्बर मार्गावरील एरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे अशा विविध स्थानकांवर मोठय़ा प्रमाणात माहिती तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. तसेच ठाण्यातून नवी मुंबईतील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडाही मोठा आहे. ठाणे, कल्याण, मुंबईतील हजारो नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी या मार्गावरून दररोज प्रवास करतात. गेल्या अठवडय़ाभरापासून ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल गाडय़ांचे बिघाडसत्र सुरू आहे.

मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दहावरील वाहिनीवर प्रवाशांना कपडा दिसून आला. या वेळी त्या ठिकाणी ९.२० वाजताची नेरुळला जाणारी

लोकल उभी होती. या प्रकाराची माहिती प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांना दिली. त्यानंतर ओव्हरहेड वायरवरील हा कपडा हटवण्यासाठी या मार्गावरील विद्युतप्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर हा कपडा हटविण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हा सर्व अडथळा दूर करण्यासाठी जवळपास २० मिनिटांचा कालावधी लागल्याने या वेळेत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांची मोठी गर्दी फलाटावर जमली होती. या घटनेमुळे या मार्गावरील लोकल गाडय़ांचे वेळापत्रक काही काळ कोलमडले. हा कपडा ओव्हरहेड वायरवर कोणी टाकला यासंबंधीची चौकशी स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे.

ओव्हरहेड वायरला २५ हजार व्हॉल्टचा विद्युतप्रवाह असल्याने तो खंडित करूनच कपडा काढण्यात आला. त्यामुळे ठाणे-नेरुळ लोकलसेवा विस्कळीत झाली होती. सकाळी ९.१९ मिनिटांनी सुटणारी लोकल ९.४२ ला नेरुळकडे रवाना करण्यात आली. –अनिल जैन, जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Overhead trans harbour indian railway akp