डोंबिवली जवळील कोपर पूर्व रेल्वे स्थानका जवळील बेकायदा चाळींच्या भागात जाण्यासाठी एक नाला लागतो. या नाल्यावर रस्ता नसल्याने या भागातील रहिवाशांनी नाल्यावर रेल्वेचे स्लीपर टाकून त्यावरुन येजा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे. या पुलावरुन येजा करताना प्रवाशांची विशेषता शाळकरी मुलांची फरफट होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ठाणे : कशेळी-काल्हेर भागात तीन तासांपासून बत्तीगुल

कोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसर हा पालिकेच्या अखत्यारित असला तरी या भागात गेल्या १५ वर्षात पाच हजाराहून अधिक बेकायदा चाळी माफियांनी बांधल्या आहेत. या भागात पालिकेचे प्रस्तावित रस्ते नाहीत. माफियांनी चाळी बांधताना ठेवलेल्या मोकळ्या जागा हेच या भागातील रहिवाशांचे रस्ते आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना डोंबिवली, कोपर भागातून आपल्या भागात येताना पाऊस असेल तर चिखल, ओसंडून वाहणारा नाला याला तोंड देत मग घर गाठावे लागते.

हेही वाचा- डोंबिवलीत ‘लोकसत्ता ९९९’ उपक्रम उत्साहात ; देवीचा जागर, कोळी गीतांवर उपस्थित थिरकले; अभिनेत्री आदिती सारंगधर हिची उपस्थिती

कोपर पूर्व भागात एक नाला आहे. या नाल्यावर रस्ता नसल्याने नागरिकांनी या नाल्यावर रेल्वेचे सिमेंटचे स्लीपर टाकून त्यावरुन येजा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे. या स्लीपरचे लोखंडी हुक वरच्या बाजुला असल्याने या नाल्यावर दुचाकी जात असेल तर त्या हुकांना अडथळा येऊन अनेक वेळा दुचाकी स्वार दुचाकीसह नाल्यात किंवा रस्त्यावर पडतो, असे स्थानिकांनी सांगितले. या भागातील अनेक शाळकरी मुले डोंबिवली शहरात शाळेत जातात. त्यांची या पुलावरुन येजा करताना त्रेधातिरपीट उडते. रात्रीच्या वेळेत या भागातून जाताना अनेक वेळा पथदिवे नसतात. त्यामुळे अंधारात चाचपडत घर गाठावे लागते, असे रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा- “एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली”; शिवसेनेच्या टीकेला नरेश म्हस्केंचे प्रत्युत्तर, म्हणाले…

पालिकेने या भागात चांगला रस्ता आणि नाल्यावर पूल बांधून देण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून केली जात आहे. पालिका अधिकाऱ्यांनी या भागात रस्ते कामे प्रस्तावित नाहीत. हा सगळा सागरी किनारा क्षेत्र, खारफुटी संवर्धन क्षेत्राचा भाग आहे. त्यामुळे या भागात सुविधा देता येणार नाही असे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers travel dangerously through on drain in kopar east in dombivli dpj
First published on: 03-10-2022 at 12:44 IST