ठाणे : तीन हात नाका येथील प्रादेशिक परिवहन कार्यालजवळ मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान बुधवारी एका कामगाराचा ७ मीटर उंचावरून खाली पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंत्राटदाराला पाच लाख रुपयांचा दंड आणि सल्लागाराला एक लाख रुपयांचा दंड आकारला आहे. कामगाराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची चौकशी केली जाणार असल्याचेही एमएमआरडीएने स्पष्ट केले.
वडाळा-घाटकोपर-कासारवडली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू आहे. या मार्गिका तयार करण्यासाठी खासगी ठेकेदारांची आणि सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली. सुरक्षा साधने वापरून काम केले जात आहे का याची तपासणी सल्लागारांकडून केली जात असते. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास धनंजय चौहान (३३) हा मजूर काम करत असताना सात मीटर उंचावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – मध्यरेल्वेच्या दिरंगाई कारभारामुळे प्रवासी हैराण
या प्रकरणाची एमएमआरडीएने गंभीर दखल घेतली आहे. ही घटना नेमकी कशी घडली याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश एमएमआरडीएने दिले आहेत. तसेच तत्काळ दंडात्मक कारवाई म्हणून कंत्राटदाराला पाच लाख रुपये आणि सल्लागाराला एक लाख रुपये दंड आकारला आहे. काही महिन्यांपूर्वी कॅडबरी नाका येथे एका महिलेचा मेट्रो खांबाच्या उभारणीसाठी बसविण्यात आलेला पत्रा अंगावर पडून मृत्यू झाला होता. तर तीन हात नाका येथे मेट्रोच्या तुळईवरून लोखंडी सळई रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटारीमध्ये शिरली होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे नागरिकांकडून मेट्रोच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.