ठाणे- घोडबंदर येथील कावेसर परिसरात असलेल्या एका उच्चभ्रु गृहसंकुलातील इमारतीच्या उद्वाहकाचे काम सुरु असताना तांत्रिक बिघाड होऊन उद्वाहकात काम करणारा व्यक्ती अडकल्याची घटना उघडकीस आली आहे. या व्यक्तीला अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने ४० मिनिटाच्या प्रयत्नानंतर उद्वाहकामधून सुखरुप बाहेर काढण्यात आले. परंतू, त्या व्यक्तीच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
घोडबंदर भागातील कावेसर परिसरात कॉसमॉस पार्क गृहसंकुल आहे. या गृहसंकुलातील तळ १२ मजली असलेल्या व्हाईट फील्ड इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती उद्वाहकाचे काम चालू होते. विजयानंद मेस्त्री (३६) हे काम करत होते. काम सुरु असताना, अचानक या उद्वाहकामध्ये तांत्रिक बिघाड होऊन विजयानंद हे उद्वाहकामध्येच अडकले. या घटनेची माहिती मिळताच, कासारवडवली पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांना ४० मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर विजयानंद यांना उद्वाहकामधून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. परंतू, या अपघातात विजयानंद यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना कावेसर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.