कल्याण-डोंबिवलीत मुखपट्टी नियमांसाठी खास पथके

कल्याण : करोना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात महापालिका तसेच नगरपालिकांनी स्वत:ची पथके तैनात केली होती. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने केलेल्या मागणीनंतर कल्याण-डोंबिवलीत मुखपट्टीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पुन्हा पोलीस रस्त्यांवर उतरले आहेत. महापालिका आणि पोलिसांची संयुक्त पथके यासाठी स्थापन करण्यात आली आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेने शासन आदेशावरून मुखपट्टी लावण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात १० प्रभाग हद्दीत कारवाई पथके तयार केली आहेत. ही पथके व्यापारी, पादचारी, दुकानदार यांच्याकडून मुखपट्टी न घातल्याने ५०० रुपये दंड वसूल करत आहेत.

पालिकेची कारवाई सुरू असूनही बाजारपेठा, रेल्वे स्थानक परिसर, सरकारी, पालिका, खासगी कार्यालये, न्यायालये परिसरात, दुकानांमध्ये अनेक रहिवासी मुखपट्टी न घालताच फिरत असल्याचे कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आले आहे. पालिका क्षेत्रात पालिका पथकांकडून पूर्ण क्षमतेने होणारी कारवाई अपुरी वाटत असल्याने, आयुक्त सूर्यवंशी यांनी कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना पत्र लिहून मुखपट्टीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी आपल्या हद्दीत विशेष पथके स्थापन करावीत अशी विनंती केली होती. पालिकेचे कर्मचारीही दंडवसुलीसाठी पोलिसांबरोबर सहभागी होतील, असे कळविले.

करोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक रहिवासी, व्यापारी, विक्रेते मुखपट्टी न घालता फिरत असल्याचे दिसते. अशा लोकांवर पालिकेकडून कारवाई केली जातेच, पण ही कारवाई आणखी प्रभावी होण्यासाठी या कामासाठी पोलिसांचे साहाय्य घेण्यात येत आहे. पोलीस या कामी रस्त्यावर उतरल्यामुळे मोहीम तीव्र होऊन नागरिकांवरही जरब निर्माण होऊ शकेल. 

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त