कल्याण – ठाकुर्ली ९० फुटी रस्त्याची मुसळधार पावसामुळे चाळण झाली आहे. यापूर्वी वाहतुकीसाठी गुळगुळीत असलेला हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आता खडबडीत झाला आहे. या रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच, आता कल्याण डोंबिवली पालिका बांधकाम विभागाने ठाकुर्ली कचोरे, खंबाळपाडा भागातील ९० फुटी रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे सुरू केली आहेत.
कल्याण ते डोंबिवली पत्रीपूल मार्गे जोडणारा ९० फुटी हा ठाकुर्लीतील महत्वपूर्ण रस्ता आहे. या रस्त्यांवर चोवीस तास वाहतूक सुरू असते. अवजड वाहने या रस्त्यांवरून धावतात. आदर्शवत असा हा रस्ता सात ते आठ वर्षापूर्वी प्रशासनाने बांधला. ९० फूट रूंदीचा कल्याण, डोंबिवली शहरातील हा पहिलाच रस्ता होता. त्यामुळे या रस्त्याचे शहरभर कौतुक होत होते. अलीकडे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे. मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर खड्डे पडले होते. जागोजागी खड्डे पडल्याने प्रवासी त्रस्त होते.
९० फुटी रस्ता परिसरातील खंबाळपाडा, भोईरवाडी, कचोरे परिसरात नवीन गृहसंकुलांची कामे सुरू आहेत. याठिकाणी येणारी मालवाहू वाहने ९० फुटी रस्त्यावरून धावतात. अवजड वाहनांची या रस्त्यावरून येजा असल्याने हा रस्ता लवकर खराब होतो, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
पालिका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला. दिवाळीपूर्वी कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील रस्ते सुस्थितीत करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे पालिकेने डोंबिवली शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावरील खड्डे भरणी, रस्ता सुस्थितीत करण्याचे नियोजन केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ९० फुटी रस्त्यावरील खड्डे भरणीची कामे पालिकेकडून सुरू आहेत. गेल्या पाच महिन्यानंतर ९० फुटी रस्त्यावरील खड्डे भरणीची कामे सुरू असल्याने आणि या रस्त्यावरून वाहने सुसाट वाहतूक करू लागल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत. कचोरे, खंबाळपाडा, पत्रीपूल, भोईरवाडी, चोळेगाव भागातील रहिवाशांनी ९० फुटी रस्ता सुस्थितीत केल्याने समाधान व्यक्त केले आहे. शाळेच्या बस या रस्त्यावरून धावतात. विद्यार्थी, शिक्षक या दररोजच्या खडबडीत रस्त्यामुळे हैराण होते. दुचाकी, रिक्षा या रस्त्यावर खड्ड्यांमुळे बंद पडण्याचे प्रमाण अधिक होते. रिक्षा प्रवासी संघटनांनी ९० फुटी रस्ता सुस्थितीत करण्यास सुरूवात केल्याने समाधान व्यक्त केले आहे.