अवकाळी पावसामुळे आवक घटल्याचा परिणाम

ठाणे : काही दिवसांपूर्वी स्वस्त झालेल्या भाज्यांच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. अद्याप बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक होत नसल्यामुळे ही दरवाढ झाल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली. किरकोळ बाजारात भेंडी, फ्लॉवर कारले, तोंडली या भाज्यांच्या दरात मागील पाच ते सहा दिवसांत ५ ते २० रुपयाने पुन्हा वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे तसेच तयार झालेल्या भाज्यांचेही मोठे नुकसान झाले. परिणामी, मुंबई तसेच उपनगरांमधील बाजारात मोठय़ाप्रमाणात भाज्यांची आवक घटल्यामुळे त्यांचे दर शंभरी पार पोहोचले होते. काही दिवसांपूर्वी भाज्यांची आवक ही काहीप्रमाणात वाढल्यामुळे त्यांच्या दरातही घसरण झाली होती. मात्र, अवघ्या काही दिवसातच काही भाज्यांच्या दरात किरकोळ आणि घाऊक बाजारात पुन्हा वाढ झाल्याचे चित्र आहे.

सध्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांच्या ५०० ते ५५० गाडय़ा दाखल होत आहेत. मागणीच्या तुलनेत ही आवक पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे काही भाज्यांचे दर हे वधारले आहेत. गेल्या वर्षी राज्यातील विविध जिल्ह्यात डिसेंबर महिन्यातही अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. भाज्यांचे नवीन उत्पादन घेण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागत असतो. त्यामुळे काही भाज्यांची उत्पादन प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्या भाज्यांची आवक अद्यापही पुरेशा प्रमाणात होत नसल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. बाजारात भेंडी, फरसबी, फ्लॉवर या भाज्यांना मोठी मागणी असते. परंतु, पुरेशा प्रमाणात आवक होत नसल्यामुळे त्यांच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे चित्र आहे. कांद्याच्या दरातही वाढ वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पाच ते सहा दिवसांपूर्वी ३२ रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा सध्या ३५ रुपये प्रति किलोने विकला जात आहे. तर, किरकोळ बाजारात पूर्वी ४० रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा सध्या ४५ रुपये प्रति किलोने विकला जात आहे. बाजारात कांद्याची आवक पुरेशाप्रमाणात होत नसल्यामुळे त्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली.