४,३१२ थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

ठाणे : करोना संकटाच्या काळातही ठाणे महापालिका प्रशासनाला ६२४ कोटी ७८ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात यश आले आहे. यंदा थकबाकीच्या रकमेवरील दंडाच्या रकमेवर शंभर टक्के सवलत देऊनही गेल्या वर्षीपेक्षा यंदा १२२ कोटी रुपयांची जास्त वसुली झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे करोना काळात पालिकेच्या इतर विभागांच्या करवसुलीवर परिणाम झाला असतानाच मालमत्ता कराने मात्र पालिका आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्यावर्षी मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. या प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात पालिका यंत्रणा व्यग्र असल्यामुळे जुलै महिन्याच्या मध्यावधीपर्यंत कराची वसुली होऊ शकली नव्हती. त्यामुळे महापलिकेची आर्थिकस्थिती काहीशी कोलमडल्याचे चित्र होते. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने जुलै महिन्याच्या मध्यावधीनंतर मालमत्ता कर आणि पाणीदेयक वसुलीवर भर दिला होता. यंदा मालमत्ता करवसुलीसाठी ६८३ कोटीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी ६२४ कोटी ७८ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे. तसेच ४३१२ थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली असून यामध्ये गाळ्यांना टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीपेक्षा अधिक वसुली

गेल्यावर्षी मालमत्ता कराची ५०२ कोटीची वसुली झाली होती, तर यंदा करोना संकट असतानाही ६२४ कोटींची वसुली पालिकेने केली असून यंदा मालमत्ता कर वसुलीची रक्कम १२२ कोटी रुपयांनी वाढली आहे. तसेच चालू आणि मागील वर्षांचा थकीत मालमत्ता कर एकत्रित भरला तर त्यावरील व्याज शंभर टक्के माफ करण्यात आले होते. या सवलतीचा १ लाख १३ हजार ५२८ करदात्यांनी फायदा घेतला असून त्यांना १३ कोटी ८६ लाखांची सवलत देण्यात आली आहे. असे असतानाही पालिकेने यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त मालमत्ता कराची वसुली केली आहे. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या सहामाहीची रक्कम एकत्रित जमा केल्यास सामान्य करामध्ये सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा फायदा सुमारे १ लाख ८० हजार २५८ इतक्या करदात्यांनी घेतला असून त्यापोटी २४१.५२ कोटींचा कर जमा झाला आहे. याशिवाय गेल्या वर्षांत २ हजार ४८७ नवीन मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली असून यापुढेही नवीन मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना करआकारणी करण्याचे काम सुरू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.