ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानक जवळील मुंब्रा देवी रस्त्याच्या एका बाजूला अजगर प्रजातीचा सर्प आढळल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच, वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन चे कर्मचारी तेथे पोहोचले आणि त्यांनी त्या अजगरची सुखरुप सुटका करुन पुन्हा जंगलात सोडले असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

मुंब्रा शहराच्या आजूबाजूला डोंगर आणि खाडी परिसर आहे. या जंगलात तसेच खाडीत अनेक प्राण्यांचा अधिवास असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे अनेकदा या जंगलातून किंवा खाडीतून प्राणी नागरी वस्तीत येतात. अशाचप्रकारे सोमवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानक परिसातील मुंब्रा देवी रस्त्यावर एका दुकानाजवळ अजगर प्रजातीचा सर्प आढळून आला. याची माहिती स्थानिकांनी तात्काळ वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनला दिली. माहिती मिळताच या संस्थेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या अजगराची सुखरुप सुटका केली. हे अजगर जंगल परिसरातून आले असावे असा अंदाज या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या अजगराला सुखरुप पकडून जंगलामध्ये सुरक्षित सोडण्यात आले आहे.