ठाण्यात बेकायदा बांधकामांचे पुन्हा इमले; अतिक्रमण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामांचे पेव पुन्हा एकदा फुटले असून भूमाफियांकडून पाच ते सात मजली इमारती उभारणीची कामे सुरु असल्याचे दिसून येते.

आयुक्तांचे शहर दौरे सुरु असतानाही भुमाफीया सक्रिय
महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामांचे पेव पुन्हा एकदा फुटले असून भूमाफियांकडून पाच ते सात मजली इमारती उभारणीची कामे सुरु असल्याचे दिसून येते. अशाचप्रकारच्या दहा बेकायदा बांधकामांची यादी आणि छायाचित्रांचा पेन ड्राइव्ह भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालिका प्रशासनाला नुकताच सादर केला असून त्यामध्ये राबोडी, बाळकुम, ढोकाळी परिसरातील बेकायदा बांधकामांचा समावेश आहे. बांधकामांचे पुरावे देऊनही कारवाई होत नसल्यामुळे आमदार केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्यात बेकायदा बांधकामांचे पुन्हा इमले उभे राहू लागले असून त्यावर कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच या बांधकामांना कुणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न विचाराला जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाकाळात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली होती. या बांधकामांच्या मुद्दय़ावरून टीका होऊ लागताच पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेतली होती. बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी आयुक्त शर्मा यांच्यावर राजकीय दबाव येऊ लागला होता. त्यासाठी भूमिपुत्रांचे कार्डही पुढे रेटण्यात आले. सुरुवातीला डॉ. शर्मा यांनी हा दबाव झुगारत कारवाई सुरूच ठेवली. काही दिवसांनंतर ही मोहिम थंडावताच भुमाफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. दिवा भागात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप होत होता. आयुक्तांचा दौरा सुरु असल्यामुळे बेकायदा बांधकामांची कामे बंद ठेवा अशी ध्वनीफितही दिव्यात प्रसारित झाली होती. या ध्वनीफितमुळे बेकायदा बांधकामांच्या आरोपांना दुजोरा मिळाला होता. आयुक्तांच्या दिवा दौऱ्याची आगाऊ खबर देऊन अनधिकृत बांधकामे बंद करण्याचा आदेश देणारी ती महिला अधिकारी कोण आहे, असा प्रश्नही त्यावेळी उपस्थित झाला होता. त्याची पालिका प्रशासनाने साधी चौकशीही केली नाही. त्याचबरोबर शहरातही आता बेकायदा बांधकामे होत असल्याची ओरड होत आहे. परंतु त्याकडे प्रशासनाचा कानाडोळा होताना दिसून येत नाही. त्यामुळे भूमाफियांचे फावले जात आहे.

भाजपने दिले पुरावे
शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी काही दिवसांपुर्वी केली होती. तसेच कारवाई होत नसेल तर बांधकामांचे पुराव्याचा पेन ड्राइव्ह प्रशासनाला देऊ असेही त्यांनी म्हटले होते. त्यानुसार त्यांनी चार दिवसांपुर्वी पालिका प्रशासनाला बेकायदा बांधकामाची छायाचित्र आणि बांधकामे सुरु असलेल्या ठिकाणांची यादी असा सविस्तर माहितीचा पेन ड्राइव्ह पालिकेच्या अतिक्रमण विभागाला सादर केला आहे. त्यात राबोडी भागातील चाळी आणि इमारतींच्या बांधकामांचा समावेश आहे. याशिवाय बाळकुम पाडा क्रमांक दोन, ढोकाळीतील गुरुचरण जमीनीवरील बांधकाम, ढोकाळी लघु क्रीडा प्रेक्षागृहालगतचा परिसरातील बांधकामांची माहिती दिली आहे. याठिकाणी पाच ते सात मजली इमारती उभारण्यात येत आहेत. त्यानंतरही बांधकामांवर कारवाई होत नसल्याबद्दल केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या सर्वच प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांमार्फत बेकायदा बांधकामांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी बेकायदा बांधकामांसंबंधी तक्रार केली होती. त्या बांधकामांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पालिकेकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या आधारेही बांधकामांवर कारवाई केली जात आहे. -जी.जी. गोदेपुरे,उपायुक्त, ठाणे महापालिका

अनधिकृत बांधकामे थांबविण्यात पालिका स्पशेल अपयशी ठरली आहे. हेवीवेट राजकीय दबावामुळे अधिकारी अगतिक ही बाब लज्जास्पद आहे. बांधकामे सुरु असल्याचे निदर्शनास आणूनही आयुक्त कारवाई करण्यास असमर्थ ठरले आहेत. कारवाई होणार नसेल तर न्यायालयात दाद मागू. तसेच आयुक्तांना दौऱ्यादरम्यान बेकायदा बांधकामे दिसत नाहीत का ? -संजय केळकर,आमदार, भाजप

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Re construction illegal structures thane question marks functioning encroachment department amy

Next Story
डोंबिवलीत हेदुटणे गावात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा अपहार ; मानपाडा पोलीसांकडून शोध सुरू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी