अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेतील सर्वोदय नगर भागात एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर वाहिन्यांमध्ये मोर अडकल्याचे समोर आले होते. प्राणीमित्रांच्या मदतीने या मोराची सुटका करण्यात आली. या मोराला वन विभागाच्या मदतीने सुखरूप जंगलात सोडण्यात आले. या परिसरापासून जंगल भाग आणि जलसाठे जवळच असल्याने तिकडून हा मोर आलेला असावा अशी शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अंबरनाथच्या चारही बाजूंना संपन्न निसर्गसंपदा आहे. एका बाजूला टाहुलीची डोंगररांग तर दुसऱ्या बाजूला वसत शेलवली, जांभूळचा डोंगर आहे. या डोंगरभागात काही महिन्यांपर्यंत बिबटय़ाचे वास्तव्य होते. अनेकदा फेरफटका मारत हा बिबटय़ा शहरांच्या वेशीपर्यंत येत होता. तर अनेक पक्षीही अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागाच्या वेशीवर पाहिले जातात. नुकतेच अंबरनाथ पश्चिमेच्या सर्वोदय नगर भागात मोराचे दर्शन झाले.
येथील शबरी हाईट्स या इमारतीच्या सातव्या मजल्यावर विविध वाहिन्यांमध्ये मोर अडकल्याचे दिसून आले. येथे वाहिन्या टाकण्याचे काम करणाऱ्या नवीन कोंका या तरुणाला हा अडकलेला मोर दिसला. त्याने तात्काळ सर्पमित्राच्या मदतीने इमारतीवर जाऊन या मोराची त्या वाहिनीतून सुटका केली. त्यानंतर या मोराबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जात या मोराची तपासणी केली. या मोराला कुणी पकडून घरात तर ठेवले नव्हते ना याचीही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खातरजमा केली. या इमारतीच्या बाजूला जंगलाचा भाग असून त्याच भागातील हा मोर येथे आला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोराला आपल्या ताब्यात घेतले होते. या मोराला जंगलात सुखरूपपणे सोडण्यात आल्याचे वन विभागाने सांगितले आहे.