बदलापूरच्या औद्योगिक वसाहतीतून कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी अंबरनाथला वाहून नेणारी जलवाहिनी रविवारी सकाळच्या सुमारास फुटली. त्यामुळे बदलापूर पूर्व येथील कर्जत राज्यमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी पसरले होते. अनेक वर्षांपासून ही सांडपाणी वाहिनी फुटत असल्याने रस्त्यावर आणि नागरी वस्तीत पाणी शिरते. नैसर्गिक नाल्याच्या माध्यमातून हेच पाणी थेट उल्हास नदीला जाऊन मिळते. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हेच या प्रदूषणाला जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांमधून होतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर शहराच्या पूर्व भागात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतीत अनेक रासायनिक कंपन्या आहेत. या रासायनिक कंपन्यातील सांडपाण्यावर प्राथमिक प्रक्रिया येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून केली जाते. मात्र कायमच या औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडले जात असल्याचा आरोप होत आला आहे. या औद्योगिक वसाहतीतून सांडपाणी अंबरनाथ येथील मोरिवली भागात असलेल्या प्रक्रिया केंद्रात जलवाहिनीद्वारे नेले जाते. बदलापूर – कर्जत राज्यमार्गाच्या कडेने ही सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी ही वाहिनी बदलण्याचे काम एमआयडीसीने पूर्ण केले. मात्र काही वर्षातच ही सांडपाणी वाहिनी फुटण्याचे प्रकार समोर आले. अनेकदा जलवाहिनीतील दाब वाढल्यानंतर हीच सांडपाणी वाहिनी फुटते. त्यामुळे बदलापूर पूर्वेतील मोठ्या परिसरात सांडपाणी पसरते. येथे मोठी नागरी वस्ती आहे. नागरी वस्तीतील सर्व रस्ते दूषित पाण्याने व्यापले जातात.

हेही वाचा: खड्डेमुक्त ठाण्याचा संकल्प; ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अभियानाचा शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच येथे बदलापुरातील नैसर्गिक नाला वाहतो. या सांडपाणी वाहिनीतील पाणी थेट नाल्यात मिसळते. हा नाला पुढे उल्हास नदीला जाऊन मिळतो. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे उल्हास नदी प्रदूषित होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. नेहमीप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. त्यामुळे या दोन्ही यंत्रणा उल्हास नदीच्या प्रदूषणाला प्रत्यक्ष जबाबदार असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा: डोंबिवली; नैराश्यातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

कोट्यवधींमध्ये उत्पन्न घेणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला साध्या जलवाहिनीच्या मजबुती करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी निधी नाही का, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास फुटलेल्या या जलवाहिनीमुळे या परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत होते. येत्या काळात या जलवाहिनीचा प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents badlapur allege that midc and mpcb are responsible for chemical sewage bursting thane tmb 01