कल्याण : कल्याण डोंबिवली शहरांच्या विविध भागात पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांमधील डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आणि इतर भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे हे कॅमेरे तात्काळ सुरू करण्याची मागणी डोंबिवलीतील रिक्षा चालक संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
पालिकेने शहरांच्या विविध भागात बसविलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शहरातील गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या समाजकंटकांवर नजर ठेवता येते. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवरही या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक विभागाला नजर ठेवता येते. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था राखणे, गु्न्हेगारी कमी करणे, गैरप्रकार रोखण्यासाठी पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसविलेले कॅमेरे खूप महत्वाचे आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे मागील काही दिवसांपासून बंद असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर पालिकेने सुरू करावेत, अशी मागणी आम्ही करत आहोत असे रिक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत याची माहिती झाल्याने अनेक रिक्षा चालक रेल्वेच्या प्रवेशव्दारावर रस्ता अडवून प्रवासी वाहतूक करत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांना नजर ठेवता येते. आपण बेशिस्तीने वागलो तर आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे याची धाकधूक नेहमीच रिक्षा चालकांसह शहरात काही गैरप्रकार करणाऱ्या समाजकंटकांना असते. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यापासून रेल्वे स्थानकासह शहरांच्या विविध भागातील गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाली आहे. अशा परिस्थितीत सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे योग्य वाटत नाही. त्यामुळे बंद सीसीटीव्ही कॅमेरे लवकर सुरू करण्यासाठी पालिकेने हालचाली कराव्यात अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष शेखर जोशी, कोषाध्यक्ष उदय शेट्टी, कैलास यादव यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे लवकर सुरू करण्यात आले नाहीतर मात्र रिक्षा संघटना आंदोलन करील असा इशारा रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. डोंबिवली वाहतूक विभागालाही या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा देखभाल करणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपल्यामुळे पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांना मिळाली आहे. यासंदर्भातच्या अधिक माहितीसाठी पालिकेचे उपायुक्त समीर भुमकर यांना सतत संपर्क साधला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.