गणेशोत्सव मंडपांसाठी रस्त्यांची अडवणूक, खोदकाम, बसथांब्यावर अतिक्रमण
गणेशोत्सवाच्या काळात विनापरवाना मंडपाची उभारणी करून वाहतुकीस अडथळा करणे, रस्त्यांवर खड्डे खोदणे अशा नियमांची पायमल्ली करणाऱ्या उपद्रवी गणेशोत्सव मंडळांना गतवर्षी आकारण्यात येणारा दंड महापालिका प्रशासनाने मंगळवारी माफ करताच या उपद्रवी मंडळींनी पुन्हा एकदा नियम धाब्यावर बसवण्यास सुरुवात केली आहे. १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ठाण्यात ठिकठिकाणी रस्ते अडवून मंडप उभारणी सुरू झाली असून काही ठिकाणी तर अलीकडेच तयार करण्यात आलेल्या नव्या रस्त्यांवर खड्डे खोदण्यात आले आहेत.
नियमांची पायमल्ली करत उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना एक लाख रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मध्यंतरी महापालिका प्रशासनाने घेतला. मात्र त्याविरोधात राजकीय पक्षांकडून विरोधाचा सूर उमटू लागताच मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या मंडळांपुढे सपशेल शरणागती पत्करत हा दंड वसूल केला जाणार नाही, अशी घोषणा केली. घोषणा करत असताना यंदाच्या वर्षी नियम पाळला नाही तर मोठी दंडात्मक कारवाई केली जाईल, असा पोकळ दमही जयस्वाल यांनी भरला. मात्र, मागील वर्षीच्या अनुभवामुळे निर्ढावलेल्या मंडळांनी जयस्वाल यांना वाकुल्या दाखविण्यास सुरुवात केली असून खड्डे खोदून, रस्ते अडवून राजरोसपणे गणेशोत्सवाची तयारी सुरू करण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणांचे दुबळेपण पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
ठाण्यातील घोडबंदर परिसरातील खेवरा सर्कल येथे एका शिवसेना नेत्याच्या मंडळाला अडथळा ठरणारा महापालिका परिवहन विभागाचा बस थांबाच आयोजकांनी कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे हा थांबा उखडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता मात्र ते शक्य न झाल्याने हा थांबा कापून मंडपामागे टाकून देण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच बस थांब्यावर मंडप बांधल्यामुळे नागरिकांनी आयोजकांविरुद्ध संताप व्यक्त केला होता. मात्र महापालिकेकडूनच परवानगी घेऊन हा थांबा बंद केल्याचा दावा आयोजकांनी केला होता. यंदा आयोजकांनी चक्क बस थांबा कापून टाकण्याचे धाडस केले असून यामुळे परिसरातील दक्ष नागरिकांनी या उपद्रवाविरुद्ध आक्षेप नोंदवला आहे. महापालिका आयुक्तांच्या वरदहस्तामुळे आयोजकांनी हा उपद्रव सुरू केला असून यामुळे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर चौफेर टीका शहरातून होऊ लागली आहे.
मंडळांचा मनमानी प्रताप
खेवरा सर्कल परिसरात शिवसेनेच्या एका बडय़ा नगरसेवकाच्या मंडळामार्फत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यासाठी आयोजकांनी येथील परिवहनचा बस थांबाच कापून काढला आहे. बस थांब्याचे लोखंडी अवशेष ताडपत्रीमध्ये गुंडाळून मंडपाच्या मागील बाजूला टाकून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कापलेल्या बस थांब्याच्या जागेवर मंडपाचे साहित्य टाकून हे लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
