डोंबिवलीतील एका विकासकाकडून आठ कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या नांदिवली पंचानंद येथील दाम्प्त्याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली. या दाम्पत्याविरुद्ध विकासकाने गुन्हा दाखल करताच हे दाम्पत्य आणि त्यांचे दोन नातेवाईक फरार झाले होते.
विद्या विश्वनाथ म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे अशी त्यांची नावे आहेत. इमारतीवरील आपला हक्क मान्य केला नाहीतर पालिका अधिकाऱ्यांना सांगून या इमारती तोडून टाकू अशी धमकी त्या वारंवार विकासकाला देऊ लागल्या. मागील दोन वर्षांपासून हे प्रकरण सुरू होते. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी जमीन मालकांनी तक्रारी करूनही पोलीस त्याची दखल घेत नव्हते.
विद्या, विश्वनाथच्या त्रासाला कंटाळून तिला रोखीने एक कोटी, पाच कोटी धनादेशाद्वारे, सव्वा कोटीच्या चार सदनिका अशी सुमारे आठ कोटीची खंडणी विकासकाने विद्याला दिली. नंतर जमीन मालकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
प्रकरण काय?
* नांदिवली पंचानंद येथे इंदिरा म्हात्रे, दशरथ म्हात्रे यांची मिळकत आहे. या दोघांनी आपल्या जमिनी दोन विकासकांना दिल्या.
* १०० सदनिका असलेल्या तीन इमारती उभ्या राहताच, तेथे याच भागात वास्तव्यास असलेल्या विद्या म्हात्रे यांनी इमारतीच्या जागेवर आपला हक्क सांगितला.
* माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून त्या विकासक, जमीन मालकाला त्रास देऊ लागल्या. विद्या यांचा पती कल्याण तहसीलदार कार्यालयात शिपाई असल्याने त्याच्याकडून विद्याला जमीनविषयक सर्व कागदपत्रे मिळाली.
