डोंबिवली – सतत कारवाई करूनही वाळू माफिया खाडीतील बेकायदा वाळू उपसा थांबवत नसल्याने कल्याण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू माफियांच्या बोटी, सक्शन पंप जाळून नष्ट करण्याची मोहीम सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच महसूल, सागरी महामंडळ, वन विभागाचे अधिकारी, पोलीस दिवा, डोंबिवलीतील जुना डोंबिवली, मोठागाव, कोपर, मुंब्रा भागात हजर झाले. त्यांनी खाडी किनारी उभ्या असलेल्या वाळू माफियांच्या उत्खनन बोटी, सक्शन पंप जाळून टाकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यात कल्याणच्या महसूल विभागाने वाळू माफियांची १० लाखाची उत्खनन साधन सामग्री जाळून नष्ट केली होती. सोमवारच्या कारवाईत २५ लाखाची सामग्री जाळून नष्ट करण्यात आली. वाळू माफिया रात्रीच्या वेळेत खोल खाडी भागात वाळूचा उपसा करतात. सकाळच्या वेळेत वाळू उपसा बोटी खाडी किनारी खारफुटी, खाडीचे डोह यांच्या आडोशाने उभ्या करून निघून जातात याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना होती. रात्रीच्या वेळेत वाळू उपसा करताना बोटीतून वाळू माफियांवर कारवाई केली तर त्यांच्याकडून प्रतिहल्ला होण्याची भीती असते. यापूर्वी असे प्रकार घडले आहेत.

त्यामुळे सोमवारी सकाळी सहा वाजता उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार नितीन बोडके, डोंबिवलीचे मंडल अधिकारी आर. के. जमदरे, ग्राम महसूल अधिकारी अरुण कासार, अश्विनी थोरात, वैभव झापडे, हनुमंत जाधव, भारती शेटे, वन विभागाचे वनपाल पी. बी. माळी, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे अधिकारी के. आर. देशमुख, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी अचानक डोंबिवलीतील मोठागाव, कोपर, दिवा, मुंब्रा दरम्यान धाडी टाकल्या. वाळू माफियांनी खाडी किनारी खारफुटी, खाडीचे डोह भागात आडोशाने उभ्या केलेल्या वाळू उपसा बोटी, उत्खनन पंप, पाडाव शोधून त्या जाळून टाकल्या.

या सामग्रीचा वाळू माफियांना पुन्हा वापर करता येऊ नये अशा पध्दतीने ही वाळू उपशाची सामग्री महसूल अधिकाऱ्यांनी जाळून टाकली. यावेळी मीठ, ज्वलनशील इतर घटकांचा वापर करण्यात आला. या कारवाईत वाळू माफियांची सुमारे २५ लाखाची साधन सामग्री नष्ट केली, असे मंडल अधिकारी जमदरे यांनी सांगितले. अशाप्रकारची कारवाई यापुढे नियमित सुरू राहणार आहे, असे ते म्हणाले.

महसूल अधिकाऱ्यांंनी डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा, गणेशनगर भागात पहाटेच्या वेळेत छापा मारून याठिकाणच्या वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकड़ून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sand mafia excavation material worth 25 lakhs burnt and destroyed on the banks of dombivli diva bay amy