नवी जागृती, नवे संदेश, नवे विचार देणारी ठाण्यातील हिंदू नववर्ष स्वागतयात्रा यंदा अधिकच दिमाखदार पद्धतीने साजरी होणार असून स्वागतयात्रेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ठाण्यातील ढोलताशा पथकांनी मोठय़ा संख्येने पुढाकार घेतला आहे. शहरातील दहाहून अधिक ढोलताशा पथके यंदाच्या स्वागतयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी ही पथके मुख्य स्वागतयात्रेत सहभागी होण्याऐवजी शहरातील चौकाचौकांमध्ये प्रात्यक्षिके सादर करणार आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागतयात्रेबरोबरीनेच शहरातील चौकांमध्येसुद्धा ढोल-ताशांचा गजर नागरिकांना अनुभवता येणार आहे. स्वच्छता आणि पर्यावरण याबाबत जागृती करण्यासोबतच नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे अशा पुरोगामी विचारवंतांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात एकजूट दाखवण्याचा प्रयत्नही या स्वागतयात्रेतून केला जाणार आहे.
ठाण्यातून निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रा यांचे मुख्य आयोजक श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास असून गेल्या तेरा वर्षांपासून १४० हून अधिक संस्था या उपक्रमात सहभागी होत असतात. गेल्या वर्षी निवडणूक वर्ष लक्षात घेऊन त्या वेळी मतदारजागृतीचा संदेश स्वागतयात्रेतून देण्यात आला होता, तर यंदा स्वागतयात्रेत स्वच्छता अभियानाचा जागर होताना दिसेल. स्वागतयात्रेच्या नियोजनासाठी सर्व संस्था मोठय़ा उत्साहामध्ये उतरल्या असून कौपिनेश्वर मंदिरामध्ये नियोजनाच्या बैठका पार पडत आहेत. या वर्षीच्या स्वागतयात्रेसाठी ढोल पथकांनी मोठय़ा प्रमाणात नोंदणी केली असून आठ ढोल पथकांनी नोंद केली आहे. यंदा ढोल पथकांची संख्या सर्वाधिक असून त्यांना स्वागतयात्रेसोबत शहरातून फिरवण्याऐवजी पहिल्यांदाच शहरातील चौकाचौकांमध्ये प्रात्यक्षिके सादर करण्याची संधी देण्यात येत असल्याची माहिती कौपिनेश्वर मंदिराचे सुधारक वैद्य यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरोगामी विचारवंतांवरील हल्ल्याविरोधात एकजूट
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा यंदाच्या स्वागतयात्रेमध्ये निषेध करण्यात येणार आहे. काळे झेंडे अथवा काळ्या फिती बांधण्याऐवजी एकाच रंगाचा वेश परिधान करून एकजुटीच्या भावनेचे दर्शन या वेळी घडवण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. स्वागतयात्रा नियोजनाची पुढील बैठक ९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता कौपिनेश्वर मंदिराच्या ज्ञानकेंद्र सभागृहात होणार आहे. शहरातील जागरूक नागरिक, संस्थांनी या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन सुधाकर वैद्य यांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanitation and environmental conservation message from new year rally