marathi medium schools : ठाणे – ठाण्यातील सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी नौपाड्यातील सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टच्या शाळेतील मराठी माध्यम बंद होऊन इंग्रजी माध्यम सुरू होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर मागील आठवड्यात प्रसारित झाला होता. या संदेशानंतर पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली होती. तसेच मनसेच्या नेत्यांनीही या प्रकरणात लक्ष घालत प्रशासनाला जाब विचारला होता. यानंतर, शाळा व्यवस्थापन आणि पालकांची बैठक पार पडली होती. त्यामध्ये पालकांची समजूत काढण्यात आली होती. दरम्यान शाळा व्यवस्थापनाच्यावतीने शाळेची भुमिका आता स्पष्ट करण्यात आली आहे.
सरस्वती मंदिर ट्रस्ट ही नोंदणीकृत शैक्षणिक संस्था आहे. सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेचा मराठी प्राथमिक विभाग १९५२ साली सुरु करण्यात आली. तसेच माध्यमिक विभाग १९६२ साली सुरु झाला. प्राथमिक आणि माध्यमिक हे दोन्ही विभाग मान्यताप्राप्त आहेत. संस्थेने शाळेची जुनी इमारत २०१८ साली पाडून तिथे नवीन इमारत उभारण्यात आली. या शाळेत मराठी प्राथमिक विभागात इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या ५४७ आहे. तर, माध्यमिक विभागाची पाचवी ते दहावीची विद्यार्थी संख्या ९७२ आहे. इंग्रजी माध्यमात इयत्ता पहिली ते आठवीची एकूण विद्यार्थी ८२५ एवढे आहेत. याशिवाय मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे २५६ व २८३ अशी आहे. अशातच या शाळेतील मराठी माध्यम बंद होऊन इंग्रजी माध्यम सुरू होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर गेल्या आठवड्यात प्रसारित झाला होता. या संदेशानंतर पालक शाळेबाहेर जमले. समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संदेशाबाबत माहिती घेण्यासाठी पालक प्रशासनाला भेटण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले होते. त्यांच्यातील संभ्रम आणखी वाढला होता. दरम्यान, मनसेचे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर प्रमुख रविंद्र मोरे यांनीही या प्रकरणात लक्ष घालत प्रशासनाची भेट घेतली होती. यानंतर शाळा व्यवस्थापनाने आपली भुमिका स्पष्ट केली होती. या नंतरही दुसऱ्या दिवशी पालकांनी शाळा परिसरात गर्दी करत प्रशासनाची भेट घेतली होती.
प्रशासनाचे म्हणणे काय ?
मराठी माध्यमाच्या पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की, मराठी शाळा बंद होईल का? पालकांची भीती अनाठायी आहे. समाज माध्यमावर अनावश्यक माहिती पसरवल्यामुळे बहुसंख्य पालक संभ्रमित झाले असून त्यांच्या मनामध्ये नाराजी आहे आणि म्हणून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रिडासंकुलाची नवीन निर्माणाधीन इमारत पूर्ण झाल्यानंतर मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे वर्ग विभागले जातील. यानंतर मराठी माध्यामाच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच इतर सोयी सुविधा कमी होणार नाहीत. त्याप्रमाणे विद्यार्थी हिताचे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवले जातात असून ते पुढेही राबवले जातील, असे शाळा व्यवस्थापनाने म्हटले आहे.
शाळा बंद करण्याचा विचार आणि गरजही नाही
लवकरच शाळेत दोन स्वतंत्र इमारती आणि वर्ग खोल्या उपलब्ध होणार आहेत. संस्थेच्या व्यवस्थापनाचा कुठल्याही प्रकारे मराठी शाळा बंद करण्याचा अथवा कमी करण्याचा विचार नाही आणि तशी गरजही नाही. मराठी शाळेविषयी संस्थेला आस्था आहे. त्याविषयी सार्थ अभिमान आहे. मराठी शाळा संस्थेची अस्मिता आहे. पुढील शैक्षणिक वर्षात दोन्ही शाळा नियमितपणे भरतील या बद्दल पालकांनी आश्वस्त राहावे. समाज माध्यमांवरील कुठल्याही खातरजमा नसलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे. आजपर्यंत पालकांनी संस्थेवर जो विश्वास दाखवला, तो तसाच राहील आणि गैरसमजाचे मळभ दूर होईल याची संस्थेस खात्री आहे. संस्थेच्या दृष्टीने विद्यार्थी हित सर्वोपरी, सर्वोच्च आहे, हिच संस्थेची धारणा आहे. या सर्वात आपले सहकार्य मिळेल याची खात्री आहे, असेही व्यवस्थापनाने म्हटले आहे.