सणासुदीच्या दिवसांत अन्न व औषध प्रशासनाची मोहीम; तपासणी अहवालानंतर दोषींवर कारवाई
दिवाळी आणि गणेशोत्सवाच्या काळात अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाने केलेल्या कारवायांत सुमारे सात हजार किलो भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले आहे. हा साठा विश्लेषणासाठी पाठविण्यात आला असून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सणासुदीच्या दिवसांत अनेक मिठाई विक्रेते पदार्थामध्ये भेसळ करत असतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याविषयी प्रश्न निर्माण होत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाने भिवंडी, ठाणे आणि मुंब्रा भागात दिवाळी आणि गणेशोत्सवाच्या काळात मोठय़ा प्रमाणात कारवाया केल्या आहेत. यामध्ये प्रशासनाने ६ हजार ९३१ किलोचे भेसळयुक्त पदार्थ जप्त केला आहे.
यात ३२७ किलो खवा, ४ हजार ३९५ किलो खाद्यतेल आणि तूप जप्त केले. १ हजार १३८ किलो मिठाई आणि १०७१ किलो रवा, मैदा आणि बेसनाचा सामावेश आहे. या खाद्यपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहे. एकूण १३ लाख २८ हजार ५४५ रुपयांचा हा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.
