ठाणे शहापूर : मुंबई आणि ठाण्यापासून अवघ्या ४० ते ५० किलोमीटर अंतरावर असलेला शहापूर तालुका सध्या पाणी टंचाईमुळे अक्षरश: एखाद्या वाळवंटाच्या स्थितीप्रमाणे झाला आहे. विहीरी कोरड्या ठाक, नद्यांमध्ये फक्त दगड-गोटे शिल्लक आहेत. येथील गाव- पाड्यांना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाण्याच्या टँकरने विहीरीत पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा टँकर कधी येईल आणि विहीरीत पाणी सोडले जाईल याची चातका प्रमाणे वाट महिला बघत आहेत. सध्या तालुक्यातील १५ गावपाड्यांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मार्च महिना सुरू होताच अशी भीषण अवस्था निर्माण पुढील तीन महिन्यांचा काळ कसा सहन करावा असा प्रश्न महिलांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहापूर तालुका निसर्गाने नटलेला आहे. एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे धरण अशा या तालुक्यातील नागरिकांची उन्हाळा सुरू होताच, घरातील कामे बाजूला सारून महिलांची पाण्यासाठी धडपड सुरू होते. या वर्षीचा उन्हाळा अधिक तप्त असल्याने येथील गावे आणि आदिवासी पाड्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पाणी अक्षरश: मृगजळा प्रमाणे भासत आहे. पाणी भरण्यासाठी तप्त जमिनीवरून चालत जावे लागत आहे. तर दुसरीकडे दुपारी डोक्यावरील सूर्य आग ओकत आहे. बोअरवेल, विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून परिसरातील पाण्याचे स्रोत आटल्याने महिलांना टँकरची चातकासारखी वाट बघावी लागत आहे. दिवसागणिक पाणीटंचाई गावपाड्यांमध्ये वाढ होत असून पंचायती समितीच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदा ८२ गावे आणि २६२ पाडे अशा एकूण ३४४ गावपाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. यासाठी किमान साडेचार कोटी खर्च अपेक्षित आहे.

मुंबई -ठाणे या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारी तानसा, भातसा, मोडकसागर ही धरणे शहापुर तालुक्यात असताना या तालुक्यातील महिलांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्यावर्षी १९८ गावपाड्यांसाठी ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यासाठी तब्बल दोन कोटी ८० लाख रुपये खर्च झाला आहे. तर यंदा टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये कमालीची वाढ झाली असून साडेचार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

टंचाईग्रस्त भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरावा यासाठी तब्बल तीनशे कोटींची गुरुत्वाकर्षणावर आधारित भावली पाणी योजना राबवण्यात येत आहे. २०२४ अखेरपर्यंत भावली पाणी योजना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कूर्मगतीने सुरू असलेल्या या योजनेच्या कामामुळे यंदा किमान साडेचार कोटी खर्च टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी लागणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यातील दांड, उंबरखांड, कोथळे, आटगाव, साकडबाव या गावांसह नारळवाडी, राईचीवाडी, उठावा, कोळीपाडा, सावरदेव, गोकुळनगर, पारधवाडी अशा १५ गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर कोठारे ग्रामपंचायत हद्दीतील तसेच वेहलोंढे, शिरगाव, फुगाळे, कळमगाव, उमरावणे या नऊ गावपाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
चौकट

धरण उशाला कोरड घशाला अशी अवस्था शहापुर तालुक्याची अवस्था झाली आहे. शहापुर हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो, असे असताना नाशिक जिल्ह्यातून एका छोट्या धरणातून शहापुर तालुक्यासाठी पाणी आणायची गरज काय ? २०२४ वर्षअखेरिस भावली ही योजना पूर्ण व्हायला हवी होती. परंतु आजपर्यंत काम पूर्णत्वास आलेले नाही. आज तालुक्यात १२ टँकर प्राथमिक स्वरुपात सुरू आहेत. जलजीवन मिशनच्या अनेक योजना अर्धवट आहेत. त्या योजनेला उदभव हा भावली योजनेचा असून या भावली योजनेतुन पाणी येईल का हेच प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे, भविष्यात गावागावात पाणीटंचाई जाणवणार आहे. भावली योजनेमुळे नविन योजना शासन दरबारी मंजूर होणार नाहीत. त्यामुळे यापुढे शहापुर तालुका हा तहानलेलाच राहील अशी भीती आहे.बाळा धानके, स्थानिक.

शहापूर तालुक्यातील जलजीवन योजनेसाठी शासनाने ५०० कोटी रुपये दिले आहे. परंतु आजही तालुक्यात पाणी टंचाईमुळे रात्री थांबून महिलांना पाण्यासाठी रांगा लावून पाणी भरावे लागत आहे. येथील लाडक्या बहिणींना १५०० रुपये नको. त्यांना नळाने पाणी हवे आहे. – प्रकाश खोडका, तालुका सचिव, श्रमजीवी संघटना शहापूर.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahapur taluka 40 50 km from mumbai faces severe water scarcity with dry wells sud 02