ठाणे – ठाणे शहरास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर या जैवविविधतेने समृद्ध अशा वनक्षेत्रांचा नैसर्गिक लाभ मिळालेला आहे. या परिसरात अनेक दुर्मिळ वन्यप्राणी, सरीसृप, किटक, पक्षी आणि वनस्पती आढळतात. यातील अनेक प्राणी वेळोवेळी मानवी वस्तीत शिरकाव करतात. विशेषतः साप आढळण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. यामुळे घाबरून नागरिक त्यांना मारून टाकतात, जे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सर्पमित्र, वनविभाग आणि पर्यावरणप्रेमी संस्था यांच्या प्रयत्नांमुळे साप मारण्याचे प्रमाण घटले असून त्यांना सुरक्षितरीत्या पकडून जंगलात सोडण्याची सुसंस्कृतता वाढत आहे.
यंदा नागपंचमी निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सर्पांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या बद्दल असलेल्या चुकीच्या समजुती दूर करणे या उद्देशाने ठाण्यातील वनशक्ती या संस्थेच्यावतीने ‘ सापांची ओळख आणि सर्पसंवर्धन’ या विषयावर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहरातील वनशक्ती संस्था ही पर्यावरण विषयक कार्यरत स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाचा उपक्रम ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालय (मराठी माध्यम) येथे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात एकूण १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सत्राचे मार्गदर्शन वनशक्ती संस्थेच्या प्रकल्प अधिकारी व वन्यजीव अभ्यासक चित्रा म्हस्के यांनी केले.
या उपक्रमातील सत्रात भारतात आढळणाऱ्या विविध सर्पप्रजाती, विषारी व बिनविषारी सापांमधील फरक, त्यांची ओळख, राहणीमान, अन्नसाखळीतील त्यांचे स्थान यावर सविस्तर माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, सापांबाबत समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज, त्यामागील वास्तव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरही चर्चा झाली. यावेळी चित्रा म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगितले की, “साप हे जैवविविधतेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. पर्यावरण समतोल राखण्यासाठी त्यांचे अस्तित्व आवश्यक आहे.”
कार्यक्रमात नागपंचमीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नागपूजन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी “सर्प जागरूकता” या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. यातून सापांविषयीची खरी माहिती आणि अंधश्रद्धा नष्ट करण्याचा स्पष्ट संदेश दिला गेला. प्रेक्षकांनी पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मागील वर्षी ३० हून अधिक सापांना जीवनदान देण्यात आले
मागील वर्षी शहरातील वनविभाग आणि सर्पमित्र यांनी एकत्र येत ३० हून अधिक सापांना जीवदान दिले होते. सापांना पाहिल्यावर ते आपल्याला हानी करणार हा विचार आल्याने अनेकदा त्यांना मारण्यात येते. मात्र शहरात सध्या सापांना मारण्याऐवजी त्यांना जीवदान देण्याकडे कल असल्याचे चित्र दिसून येते. संस्थांच्यावतीने मागीलवर्षी नाग, अजगर, धामण, मन्यार, घोणस या प्रजातींना जीवदान देण्यात आले होते . हे साप बांधकाम सुरू असलेल्या जागी, तलावात, घरांच्या छपरावर, कारखान्यात येथे सापडले होते.
साप कसे पकडले जातात
ज्या ठिकाणी साप आढळून येतात त्या परिसरातील नागरिक सर्पमित्रांना संपर्क साधतात. वनविभाग आणि अग्निशमन दलात याबाबत तक्रार दाखल होते. ज्या परिसरात साप आढळला आहे तेथे जाऊन त्या सापांची प्रजात ओळखून सुरक्षितपणे त्याला परिसरातून बाहेर काढण्यात येते. सापांना माणसांचा स्पर्श झाल्यास ते घाबरतात त्यामुळे साप पकडताना कोणताही स्पर्श होणार नाही याची काळजी घेतली जाते. साप पकडत असताना साधनांचा वापर केला जातो. प्रत्येक साप हा विषारी आहे हे समजुनच पकडण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सापाला पकडल्यानंतर कोणती जखम झाली आहे का याची तपासणी केली जाते. त्यानंतरच जंगलात सोडले जातात.