आवाजी फटाक्यांपेक्षा पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याकडे ओढा
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत असलेली जनजागृती, पोलीस व प्रशासनाने आणलेले र्निबध आणि एकूणच प्रदूषणाबाबत नागरिकांत निर्माण होत असलेली सजगता या सर्वाचा परिणाम यंदाची दिवाळी कमी ‘धडधडाटी’ होण्यात झाला आहे. ठाणे शहरात दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे झालेल्या ध्वनिप्रदूषणाची पातळी यंदा जवळपास १० ते १५ डेसिबलने घसरली आहे. यंदाच्या वर्षी सर्वाधिक ११० ते ११५ डेसिबल इतकी फटाक्यांच्या आवाजाची पातळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नोंदवण्यात आली. मात्र, गतवर्षी याच दिवशी फटाक्यांचा आवाज १२५ ते १३० डेसिबलपर्यंत पोहोचला होता.
सण आणि उत्सवांच्या दरम्यान होणाऱ्या मोठय़ा आवाजाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयीन याचिका दाखल करत न्यायव्यवस्थेचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. उच्च न्यायालयानेही नागरिकांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणाऱ्या उत्सवांवर कारवाईचे आदेश पोलीस आणि महापालिकेला दिले होते. दुसरीकडे सामाजिक संस्थांकडून पर्यावरणपूरक उत्सवांच्या जनजागृतीसाठी व्यापक प्रयत्न केले जात होते. याचा परिणाम यंदाच्या दिवाळीत दिसून आला. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी दिवाळीच्या काळात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आवाजाची पातळी मोजली असून त्यातून त्यांना हा सकारात्मक बदल जाणवला आहे. यंदा पहिल्यांदाच पोलीस प्रशासनाकडूनही ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजली जात होती. पोलीस प्रशासनाकडूनही व्यापक उपाय योजना करण्यात आल्या.
दिवाळीच्या पहिल्या दिवशीच्या नोंदीमध्ये सर्वाधिक आवाज वसंत विहार परिसरात ९५ डेसिबल इतका होता, तर अन्य भागामधील आवाजाचे प्रमाण ८५ ते ९० डेसिबल होते. लक्ष्मीपूजनाला गोखले रस्ता परिसरात बदल दिसून येत होते. गोखले रस्ता, राममारुती रस्ता, बेडेकर हॉस्पिटल भागामध्ये फटाक्यांचे प्रमाण कमी होते. पाचपाखाडी आणि वर्तकनगर या भागात ११० ते ११५ डेसिबल इतक्या आवाजाची नोंद झाली.
ठाणे शहरात राबवण्यात येणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या जनजागृतीचे सकारात्मक चित्र ठाण्यात दिसू लागले असून यंदा लहान मुले फटाके वाजवताना कमी प्रमाणात दिसून आले. गरीब वस्त्यांवरही फटाके कमी झाल्याचे चित्र होते. शांतता क्षेत्रातही बदलाचे वारे दिसून येत होते. व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजवण्याकडील कल काहीसा कमी झाल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. मात्र काही मोठय़ा सोसायटय़ांच्या आवारात ध्वनिप्रदूषण जास्त होते. त्यामुळे सोसायटय़ांनी अधिक जागृकतेने परिसरात फटाके वाजवण्यास बंदी घालण्याची गरज आहे.
– डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते