कोपरी पुलाच्या कामामुळे परिणाम होऊ न देण्याचा प्रयत्न

ठाणे : कोपरी येथील जुना रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष पथक नेमले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह ४० जणांचे पथक प्रत्येक १२ तासांसाठी नेमण्यात आले आहे. पोलिसांच्या पथकामुळे आणि पर्यायी रस्त्यांच्या नियोजनामुळे बुधवारी सकाळी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी टळल्याचे चित्र होते.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) तसेच रेल्वे प्रशासनाकडून कोपरी उड्डाणपुलाच्या जुन्या पुलाचे बांधकाम मंगळवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना जुन्या पुलावरील वाहतूक बंद करावी लागली आहे. येथील वाहतूक नव्या कोपरी पुलावरून तसेच सेवा रस्ते मार्गावरून वळविण्यात आली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरून हजारो वाहने मुंबईच्या दिशेने जात असतात. त्यामुळे बुधवारी वाहतूक कोंडी होईल असा अंदाज बांधला जात होता. मात्र, पोलिसांनी या ठिकाणी केलेले व्यवस्थापन तसेच पर्यायी मार्गाचा योग्य वापर झाल्याने सकाळच्या वेळेत ठाणेकरांना कोंडीत अडकावे लागले नाही. वाहतूक सुरळीत असल्याने चालकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले. कोपरीचा जुना पूल बंद असला तरीही अवघ्या तीन मिनिटांत कोपरी पूल येथील गुरुद्वारा ते मुलुंड टोलनाका गाठता आले, असे रमाकांत सुर्वे या या चालकाने सांगितले.

४० जणांचे पथक

 पोलिसांनी या पुलाची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील पोलीस अधिकाऱ्यांसह ४० जणांचे पथक तैनात केले आहे. प्रत्येक १२ तासांसाठी हे पथक आहे. रात्रीच्या वेळी ज्ञानसाधना महाविद्यालय दिशेकडील तर, सकाळी गुरुद्वाराच्या दिशेकडील नव्या पुलावर पोलिसांकडून व्यवस्थापन केले जाईल.  

कोपरी पूल परिसरात वाहतूक पोलीस तैनात केले आहेत. व्यवस्थापन तसेच पर्यायी रस्त्यांच्या योग्य नियजोनामुळे वाहतूक कोंडी टळली.

बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा