१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. जून १९६१ ला राज्यातील पहिल्या शान्लात परीक्षेचा निकाल लागला. संपूर्ण राज्यात मो. ह. विद्यालयाचा हेमू प्रधान पहिला आला होता. केवळ हेमू राहत होता त्या चरईत नाही तर त्यावेळच्या संपूर्ण ठाणे गावाने फटाक्यांच्या आतषबाजीने दिवाळी साजरी केली होती. जुने ठाणेकर अजून तो दिवस आणि ती रात्र विसरणार नाहीत. आपल्याच कुटुंबातील जवळचा कुणीतरी पहिला आला, याच भावनेने प्रत्येक ठाणेकराने हेमूच्या यशाचा आनंदमहोत्सव साजरा केला होता. प्राध्यापक डॉ. हेमचंद्र प्रधानांच्या या पराक्रमाची पुनरावृत्ती आजपर्यंत ठाण्यातील कुणीही विद्यार्थी करू शकला नाही.
सुरुवातीच्या काळात म्हणजे १९७०-७५ पर्यंत शाळा सुरूहोता होता येणारा हा निकालाचा दिवस म्हणजे संपूर्ण शहरासाठी उत्सुकतेचा दिवस असायचा. सकाळपासून सन्मित्र आणि इतर प्रेसच्या समोर सर्व शाळांमधील मुलांची आणि पालकांची झुंबड उडायची. एका चिठ्ठीवर परीक्षा क्रमांक लिहून प्रेसच्या खिडकीतून चिठ्ठी आत सरकवायची. थोडय़ा वेळाने गुणसंख्या बाहेर यायची. किती टक्के मिळाले हा प्रकार नव्हता. पास की नापास. पास झालेल्या मुलाच्या नावाने प्रचंड हुर्रे असा गल्ला, नापास झाले तरी काही विशेष वाटायचे नाही, तो मुलगा पास झालेल्या मुलांच्यात परत आरडाओरड करायला मोकळा. बहुतेक सर्व मुले ३५ ते ५५ टक्यांमधली. ६० टक्क्य़ांच्या वर गुण फार कमी मुलांना मिळत असत. ७० टक्क्य़ांपेक्षा अधिक फारच थोडी मुले. ती खरी स्कॉलर मुले. घरी निकालाचे पण काही टेन्शन नसायचे. पास झाला असेल तर शाबासकी, नाहीतर ‘चला ऑक्टोबरची तयारी सुरू करा’ असा वडिलकीचा उपदेश. झाडावरील सर्वच फळे एकाच वेळी पिकत नाहीत हे समजण्याचा समजूतदारपणा गेल्या पिढीकडे होता. त्या काळात अजूनही बहुतेक घरातील पहिली पिढी शालान्त परीक्षेला बसत होती. त्यामुळे शालान्त परीक्षा नापास (मॅट्रिक फेल) ही पण एक सन्मानपूर्वक पदवी होती.
त्या नंतरच्या काळात एकंदरीतच गुणवत्ता यादीचे महत्त्व नको तितके वाढू लागले. गुणवत्ता यादीत येण्यातील निरागस आनंद नष्ट झाला होता. उरली होती ती जीवघेणी लढाई. यामध्ये खाजगी क्लासेसनी तेल ओतले आणि त्यात बळी जाऊ लागले कोवळी मुले. त्या अगोदर काही वर्षे शालान्त परीक्षेच्या निकालाचा दिवस म्हणजे ‘सरस्वती सेकंडरी स्कूल’ शाळेसाठी पर्वणी असायची. निकालासाठी जमलेली मुले. आपल्याला मिळालेल्या गुणांपेक्षा आपला मित्र, मैत्रिण बोर्डात पहिले- दुसरे आलेल्याचा आनंद, शाळा सुरू असल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील उत्साह ओसंडून जात असे. हे सगळेच रोमांचकारक होते. अलीकडेच यंदाचा शालान्त परीक्षेचा निकाल लागला. सवयीप्रमाणे शाळेत डोकावलो, पण कुठेच उत्साह दिसला नाही. मुलांना घरी बसल्या बसल्या नेटवर गुण समजण्याची सोय झालेली असल्याने अगदीच कमी मुले शाळेत जमली होती. शाळा बंद असल्याने सारे कसे शांत शांत होते. शाळेच्या बाहेर जमलेल्या छोटय़ा ग्रुपमध्ये कुठल्याही प्रकारचा आनंद, उत्साह जाणवत नव्हता. गुणाच्या धबधब्याखाली ओलेचिंब होऊनही मुले कोरडी होती. पुढील प्रवेशाच्या काळजीच्या वणव्यात अडकलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चमक दिसत नव्हती.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2015 रोजी प्रकाशित
प्रासंगिक : नाही क्लास, तरीही उत्तम!
नुकताच दहावीचा निकाल लागला. बहुतेकांनी उत्तम गुण मिळविले. परीक्षेचे प्रश्न आणि नियम समान असले तरी त्याला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती मात्र भिन्न असते.

First published on: 30-06-2015 at 12:09 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ssc students do wonders despite bad circumstances