|| आकांक्षा मोहिते
ठाणे मनपा परिवहनच्या तिजोरीत दीड कोटींची भर
ठाणे : मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या पथ्यावर पडला आहे. एसटीची वाहतूक पूर्णपणे सुरू नसल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून ठाणे ते बोरिवली, मीरा-भाईंदर आणि भिवंडी या मार्गावर टीएमटीने दिवसाला २० जादा फेऱ्या वाढवलेल्या आहेत. या बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या संपकाळात टीएमटीच्या उत्पन्नात दीड कोटी रुपयांची भर पडली आहे.
ठाणे ते बोरिवली, मीरा-भाईंदर आणि भिवंडी या मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी संख्या असते. त्यामुळे या मार्गांवर राज्य परिवहन महामंडळाच्या आणि ठाणे परिवहन उपक्रमाच्या गाड्या मोठ्या प्रमाणात चालवण्यात येतात. मात्र दोन महिन्यांपासून ठाण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवल्याने एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर ठाणे परिवहन उपक्रमाने ठाणे ते बोरिवली, मीरा-भाईंदर आणि भिवंडी या मार्गांवरील प्रवाशांच्या सोयीसाठी टीएमटीच्या बसफेऱ्यांत वाढ केली आहे. त्या बसगाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने टीएमटीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी अद्याप संप पूर्णपणे मागे घेतलेला नाही. त्यामुळे ठाणे ते बोरिवली, मीरा-भाईंदर, नालासोपारा आणि भिवंडी या मार्गावर असणारी एसटीची वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेने सुरु आहे, असे एसटीच्या ठाणे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये यासाठी टीएमटीच्या या मार्गावरील दिवसभरात २० जादा फेऱ्या अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे प्रवासी संख्येत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असून मागील दोन महिन्यांत टीएमटीच्या उत्पन्नात १ कोटी ५० लाख रुपयांची भर पडली आहे. दर दिवसाला ठाण्याहून बोरिवली मार्गावर जाण्यासाठी ५२ फेऱ्या होत असतात. मागील दोन महिन्यांपासून यामध्ये पाच जादा फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ठाणे ते मीरा-भाईंदर मार्गावर २४ फेऱ्या सोडण्यात येत असून प्रवाश्यांच्या मागणीनुसार या मार्गावर नऊ जादा फेऱ्या वाढवल्या आहेत. तर भिवंडी मार्गावर ६४ फेऱ्यांमध्ये अधिक सहा फेऱ्यांची भर करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे परिवहन सेवेच्या व्यवस्थापकांनी दिली.
एसटी महामंडळाच्या संपामुळे ठाण्याहून बोरिवली, मीरा-भाईंदर आणि भिवंडी या मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार ठाणे परिवहन उपक्रमांच्या बसमध्ये वाढ केली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे
– शशिकांत धात्रक, प्रभारी परिवहन उपव्यवस्थापक, ठाणे परिवहन सेवा