खारफुटी, जुनाट झाडे तोडून, तलाव बुजवून उभारलीत बांधकामे
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंत्रणा व्यस्त झाल्याने भूमाफियांनी पुन्हा एकदा खारफुटी, जुनाट झाडे तोडून, तलाव बुजवून चाळी, इमारतींची बेकायदा बांधकामे सुरु केली आहेत. ही नवी बांधकामे शोधून प्रभाग अधिकाऱ्यांनी बांधकामे भुईसपाट करण्याची जोरदार मोहिम सुरु केली आहे.
महापालिका हद्दीत नव्याने उभी राहिलेली सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिक्रमण नियंत्रण विभागीय उपायुक्त आणि प्रभाग अधिकारी यांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे अ प्रभागाच्या हद्दीत अटाळी, बल्याणी गाव हद्दीत प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी चाळी, इमारत बांधण्यासाठी बांधलेले १० हून जोते जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मोहने, आंबिवली, बल्याणी, टिटवाळा, मांडा भागात बेकायदा बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील जगदम्बा मंदिर भागात भूमाफियांनी खारफुटी, जुनाट जंगली झाडे तोडून चाळी उभारणीसाठी मातीचे भराव, ३० हून अधिक जोते बांधले होते. काही जोत्यांवर इमारत, चाळी बांधण्याची कामे सुरू केली होती. ही सर्व नवीन बेकायदा बांधकामे ह प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जमीनदोस्त केली. अशीच कारवाई कुंभारखाणपाडा, नवापाडा, गणेशनगर, मोठागाव, रेतीबंदर, गरीबाचावाडा भागातील बेकायदा बांधकामांवर करण्यात येणार आहे, असे प्रभाग अधिकारी गुप्ते यांनी सांगितले. सध्या प्रभागात बेकायदा बांधकामांचे सव्र्हेक्षण सुरू केले आहे. हे सव्र्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना नोटिसा देण्यात येणार आहेत. कोपर पूर्व रेल्वे स्थानक आयरे भागात बालाजी गार्डन गृहसंकुलाच्या मागे अनेक चाळींची बेकायदा बांधकामे सुरू होती. ही बांधकामे प्रभाग अधिकारी संदीप रोकडे यांच्या पथकाने जमीनदोस्त केली. आडिवली-ढोकळी येथील बेकायदा इमारती तोडण्याची मोहिम आय प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी सुरू केली आहे.
मंगळवारी दिवसभरात एक इमारत जमीनदोस्त केली. आडिवली-ढोकळी भागात ५०० हून अधिक बेकायदा इमारती गेल्या पाच ते सहा वर्षांत माफियांनी बांधल्या आहेत. खडेगोळवली येथील कैलासनगर भागातील एक इमारत ड प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी जमीनदोस्त केली. येत्या काही दिवसात डोंबिवलीतील चार ते पाच टोलेजंग बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. गांधीनगर नाल्याजवळील दोन ते तीन बेकायदा इमारती तोडण्याची कारवाई पोलीस बंदोबस्त मिळताच केली जाणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
फोटो ओळ