ठाणे: महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (CCMP) कोर्स पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्यानुसार,इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ठाणे शाखेच्या वतीने कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततामय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात ठाणे जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने डॉक्टर्स सहभागी झाले होते. या संपामुळे सर्व रुग्णालयातील बाह्यरुग्णसेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर, केवळ आपत्कालीन सेवा सुरु होत्या.

NEET PG २०२४ द्वारे प्रवेशित २६५ इन-सर्व्हिस निवासी डॉक्टरांचे मागील सहा महिन्यांपासून थकीत असलेले वेतन आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (CCMP) कोर्स पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला दिलेली परवानगी या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) वतीने विविध शहरांमध्ये डॉक्टरांनी निषेध व्यक्त करत मोर्चा काढला. ठाणे शहरातही आयएमएच्या ठाणे शाखेच्या वतीने कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततामय मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो डॉक्टरर्सनी सहभाग नोंदवला होता. यासंपामुळे रुग्णालयातील बाह्यरुग्ण सेवा २४ तासासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर, केवळ आपत्कालीन सेवा सुरु आहेत. यामुळे ऐन सकाळी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय झाली. आयएमए च्या मते, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमधील होमिओपॅथी डाॅक्टरांच्या नोंदणीचा निर्णय हा प्रस्थापित वैद्यकीय नियामक यंत्रणेला बाधा पोहोचवणारा असून, वैद्यकीय शिक्षण आणि सेवांमध्ये गैरसमज आणि असमाधान निर्माण करणारा आहे. या मोर्चाद्वारे आयएमए च्या ठाणे विभागाच्या प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ज्यामध्ये MMC नोंदणी प्रक्रियेतील या निर्णयाविरोधात आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणणे काय ?

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (CCMP) कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टर्सची एमएमसी अंतर्गत नोंदणी झाली तर, भविष्यात एमएमसी नोंदणीचा आधार घेऊन जनतेची दिशाभूल करुन रुग्णांना चुकीच्या व्यक्तीकडून चूकीच्या पद्धतीने उपचार केले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील गुणात्मक सेवेवर या निर्णयाचा विपरित परिणाम होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ॲलोपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी घेतले जाणारे शिक्षणाची गुणवत्ता आणि होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय येथे घेतले जाणारे शिक्षणाची गुणवत्ता एक समान असू शकत नाही. म्हणून, या निर्णयाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.