ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला खेटूनच उथळसर परिसर येतो. या प्रभागातील राबोडी परिसर वगळता उर्वरित भागात गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये उथळसर परिसरातून १२ नगरसेवक निवडले जाणार असून या ठिकाणी शिवसेना आणि भाजपने एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेला सोडचिठ्ठी देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भाजपने उमेदवारी देऊन शिवसेना उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे. याशिवाय, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांनीही उमेदवार उभे केले आहेत.
सेना-राष्ट्रवादीत लढत
प्रभाग क्रमांक १० मध्ये साकेत, राबोडी, के-व्हिला आणि वृंदावन असा परिसर येतो. यंदा या परिसरातून राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक नजीब मुल्ला, सुहास देसाई, वहिदा खान हे निवडणूक लढवीत आहेत. या तिन्ही उमेदवारांपुढे शिवसेना, भाजप आणि मनसेने उमेदवार उभे करून त्यांना आव्हान दिले आहे. तर याच प्रभागात मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या विद्यमान नगरसेविका रत्नप्रभा पाटील या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत असून त्यांच्यापुढेही शिवसेना, भाजप आणि मनसेने उमेदवार उभे केले आहेत. या प्रभागातून माजी नगरसेवक संजय तरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली असून त्यांची लढत राष्ट्रवादीचे सुहास देसाई यांच्याशी होणार आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक -१०
प्रभाग क्षेत्र – साकेत, राबोडी, के-व्हिला आणि वृंदावन
स्त्री-१४,८३३
पुरुष-१६,८४४
एकूण-३१,६७८
भाजप-शिवसेनेत रंगतदार लढत
प्रभाग क्रमांक – ११ मध्ये श्रीरंग, आझादनगर, हंसनगर, परेरानगर, कोलबाड आणि गोकुळदासवाडी असा परिसर येतो. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या विद्यमान नगरसेविका नंदा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यंदाच्या निवडणुकीत भाजपने नंदा पाटील आणि त्यांचे पती कृष्णा पाटील या दोघांना उमेदवारी दिली आहे. नंदा पाटील यांच्यासमोर शिवसेनेने वैशाली भोसले, काँग्रेसने सारिका यादव आणि मनसेने रेखा केसरकर यांना उमेदवारी दिली आहे. कृष्णा पाटील यांच्यासमोर शिवसेनेने नगरसेवक रामचंद्र एगडे यांचे चिरंजीव ललित एगडे यांना उमेदवारी दिली आहे. या प्रभागामध्ये शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका महेश्वरी तरे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर शिवसेनेने दीपा गावंड, राष्ट्रवादीने अरुणा पेंढारे यांना उमेदवारी दिली आहे.
प्रभाग क्रमांक -११
प्रभाग क्षेत्र – श्रीरंग, आझादनगर, हंसनगर, परेरानगर, कोलबाड, गोकुळदासवाडी.
स्त्री -१८,४८५
पुरुष-२०,१३७
एकूण-३८,६२३
चौरंगी लढतीची अपेक्षा
प्रभाग क्रमांक-२२ मध्ये सेंट्रल जेल आणि महागिरी हा परिसर येतो. या प्रभागामध्ये शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सुधीर कोकाटे, राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक महादीप बिस्ट हे निवडणूक लढवीत आहेत. तसेच शिवसेनेच्या माजी नगरसेविका शांता सोळंकी यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक महेश वाघ यांची पत्नी साधना यांनाही शिवसेनेने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक पवन कदम यांच्या पत्नी पल्लवी कदम यांनाही शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसला सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या विद्यमान नगरसेविका मेघना हंडोरे यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून त्यांच्यासमोर शिवसेनेने शांता सोळंकी, मनसेने प्रीती सावर्डेकर, काँग्रेसने धर्मवीर मेहरोल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या प्रभागात चौरंगी लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक २२
सेंट्रल जेल, महागिरी
स्त्री-२०,६७२
पुरुष-२१,९३४
एकूण-४२,६०६