ठाणे – ग्रामीण भागाच्या आरोग्यसेवेची धुरा सांभाळणारी व्यवस्था म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र ओळखली जातात. मात्र ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसमवेतच चक्क शहापूर उपजिल्हा रुग्णालयाला देखील पावसामुळे गळती लागल्याचे उघड झाले होते. याबाबत लोकसत्ताने वृत्तांकन केल्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात विधानपरिषदेत याबाबत लक्षवेधी देखील लागली होती. यालाही दोन आठवड्यांहून अधिकचा कालावधी जाऊनही ढिम्म प्रशासनाकडून याबाबत गळती रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. तर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात देखील परिस्थितीत जैसे थी अशीच असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाकडे आणि विशेषतः आरोग्य व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सातत्याने समोर आले आहे. शहापूर आणि मुरबाड या दोन ग्रामीण तालुक्यांच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये विविध त्रुटी असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. काही महिन्यांपूर्वीच शहापूर तालुक्यात सुरु करण्यात आलेले डायलिसिस केंद्रात अपुरी व्यवस्था असल्याने आणि डॉक्टरांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी केंद्रांतून उपचार घ्यावे लागत असल्याचे उघड झाले होते. याच पद्धतीने आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताला गळती लागल्याने रुग्णांना तशाच स्थितीत नाईलाजाने उपचार घ्यावे लागत असल्याचे उघड झाले होते.

तर ही गळती रोखण्यासाठी आरोग्य केंद्राकडून ताडपत्रीचा आधार घेण्यात आला होता. तर काही रुग्णांना हिरकणी कक्षात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. तर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पुरुष रुग्णांच्या कक्षात ही पावसामुळे गळती आहे. तर छतावर सर्वत्र ओलावा पसरला आहे. यामुळे प्लास्टर कमकुवत होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक वयोवृद्ध रुग्ण देखील या ठिकाणी उपचार घेत असून संपूर्ण जमिनिवर पाणी असल्याने पाय घसरुन पडल्याने दुखापत होण्याची शक्यता आहे. मात्र याची देखील सध्या तीच अवस्था असल्याने रुग्णांना गेल्या अनेक दिवसांपासून गळक्या छताखालीच उपचार घ्यावे लागत आहे.

आमदाराच्या तक्रारींकडे देखील दुर्लक्ष

अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या गळतीबाबत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडून यावर तातडीने उपायोजना राबविण्याबाबात मागणी केली होती. मात्र यानंतर देखील हे काम आद्यप सुरु झाले नसल्याची माहिती अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी रमेश जाधव यांनी सांगितले. यामुळे रुग्णांना अजूनही गळक्या छताखाली उपचार घ्यावे लागत आहे. तर लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात समस्यां मांडून ही ढिम्म प्रशासनाकडून याबाबत उपायोजना करण्यास वेळकाढूपणा करण्यात येत आहे.