कामाची देयके देण्याइतपतही परिस्थिती नाही
ठाणे : करोना संकटाच्या काळात मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुली उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यात पालिकेला यश आले असले तरी इतर विभागांच्या कराची अपेक्षित वसुली झाली नसल्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. वस्तू आणि सेवा कराचे पैसे राज्य शासनाकडून मिळाल्याने त्यातून आतापर्यंत पालिकेला अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य झाले असून त्याचबरोबर मालमत्ता कर आणि पाणी देयकातून जमा झालेल्या पैशातून करोना उपाययोजना आणि काही विकासकामे करणे शक्य झाले आहे. मात्र आता विकासकामांची देयके देण्याइतपतही पालिकेची परिस्थिती नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेची वर्षभरापूर्वी आर्थिक परिस्थिती चांगली होती. मात्र, गेल्यावर्षी करोना संकटामुळे पालिकेच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. आतापर्यंत मालमत्ता कराची ५७७ कोटी तर पाणी देयकाची १३७ कोटी रुपये वसुली झाली असून मार्च महिनाअखेपर्यंत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही करांच्या वसुलीत वाढ झाली आहे. असे असले तरी शहर विकास विभाग, अग्निशमन दल, जाहिरात तसेच इतर विभागांकडून विविध करांची अपेक्षित वसुली होऊ शकलेली नाही. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी २८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्प १३०० कोटी रुपयांनी कमी करण्यात आला आहे. तसेच महापालिकेने यापूर्वी प्रशाकीय मान्यता दिलेल्या आणि निविदा काढलेल्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ४५५ कोटींची कामे पहिल्या टप्प्यात हाती घेतली होती. उर्वरित कामे पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मालमत्ता कर आणि पाणी देयकातून जमा झालेल्या पैशातून करोना उपाययोजना आणि काही विकासकामाची देयके देणे पालिकेला शक्य झाले आहे. तर, राज्य शासनाकडून वस्तू आणि सेवा कराचे पैसे मिळाल्याने त्यातून आतापर्यंत पालिकेला अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य झाले. मात्र, पालिकेच्या तिजोरीत पुरेसे पैसे शिल्लक राहिलेले नसून त्याचबरोबर विकासकामांची देयके देण्याइतपतही पालिकेची परिस्थिती नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
उद्दिष्ट आणि वसुली
’ ठाणे महापालिकेने विविध विभागांच्या करापोटी २८०७ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले असून त्यापैकी २३३५ कोटी रुपये पालिकेला उत्पन्न मिळाले आहे. ४७१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेले नाही.
’ मालमत्ता करापोटी ६४५ कोटी रुपये उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५७७ कोटी मिळाले आहेत.
’ पाणी देयकांच्या १६० कोटीपैकी १३७ कोटी मिळाले आहेत.
’ शहर विकास विभागाच्या विविध करापोटी २६० कोटी वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १४५ कोटी वसूल झाले आहेत.
’ अग्निशमन दलाच्या वसुलीपोटी ४८ कोटीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १७ कोटी रुपये मिळाले आहेत.
’ वस्तू आणि सेवा करापोटी ८४० कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी ८३९ कोटी रुपये मिळाले आहेत.
’ महसुली खर्चावर १४९६ कोटी तर भांडवली खर्चावर ५१० कोटी रुपये खर्च झाले आहेत.
१०० कोटी मिळाल्यानंतर देयके
ठाणे महापालिका प्रशासनाने ४५५ कोटी रुपयांच्या विकासकामांची देयके देण्यासाठी चार याद्या तयार केल्या होत्या. त्यापैकी तीन याद्यांमधील कामांचे पैसे टप्प्याटप्प्याने देऊ केले आहेत. आता चौथी यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यांचे देयक देण्याइतपत पालिकेची परिस्थिती नाही. त्यामुळे राज्य शासनाकडून मुंद्राक शुल्कापोटी १०० कोटी रुपये मिळाल्यानंतर त्यातून या देयके देण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
