सण-उत्सवांपूर्वीची लगबग नसल्याने पालिकेचेही दुर्लक्ष
ठाणे : करोना नियंत्रणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या ठाणे महापालिकेचे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि उड्डाणपुलांवर मोठे खड्डे पडले आहेत. महापालिकेने कोटय़वधी रुपयांचा खर्च करत गेल्या वर्षी बांधलेल्या नव्या रस्त्यांचीही चाळण झाली आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. दर वर्षी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी तीव्र होते आणि त्या दबावापोटी पालिका डागडुजी करते. मात्र, यंदा गणेशोत्सवच साधेपणाने साजरा होत असल्याने पालिकेने खड्डय़ांकडेही दुर्लक्ष केले आहे.
यंदा टाळेबंदी लागू केल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीपासून ठाणे शहरातील मुख्य रस्ते आणि उड्डाणपुलांवर वाहतुकीची वर्दळ कमी होती. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाईल, अशी नागरिकांना आशा होती. करोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये प्रशासन व्यस्त असल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये रस्त्यांच्या डागडुजीची कामे रखडली. परिणामी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील घोडबंदर मार्ग, कॅडबरी जंक्शन, तीनहात नाका परिसर, कापूरबावडी, माजिवडा चौक, बाळकुम नाका, मुंब्रा येथील शिळफाटा मार्गावरील वाय जंक्शन, खान कंपाऊंड, दिव्यातील आगासन रस्ता, साबेगाव रस्ता या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत, तर घोडबंदर मार्गावर असलेल्या सर्वच उड्डाणपुलांवर खड्डे पडले असून अनेक ठिकाणांचे डांबरही वाहून गेले आहे. पावसामुळे खड्डय़ांमध्ये पाणी साठत असल्यामुळे वाहनचालकांना खड्डय़ांचा अंदाज येणेही शक्य होत नाही. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे.
वर्षभरात चाळण
ठाण्यातील नितीन कंपनी, ज्ञानेश्वर नगर, कामगार नगर, कोरस रस्ता, शास्त्री नगर आणि मानपाडा या ठिकाणाच्या रस्त्यांची कामे गेल्या वर्षी करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात या मार्गावरील रस्त्यांवर खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या खड्डय़ांमुळे नव्या रस्त्यांवर अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे.
मॅरेथॉन रद्द झाल्यामुळे..
ठाणे शहरात दर वर्षी जुलै महिन्यात महापौर वर्षां मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या निमित्ताने महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र, करोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदाची वर्षां मॅरेथॉन रद्द झाली. त्यामुळे जुलै महिन्यातील खड्डे भरणीही रखडली. त्यातच करोना उपाययोजनांमध्ये प्रशासन व्यस्त असल्यामुळे गणपतीच्या तोंडावरही महापालिका प्रशासनाचे खड्डे भरण्याकडे लक्ष नसल्याच्या प्रतिक्रिया शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
येत्या शनिवारी गणेशोत्सव असल्यामुळे नागरिक मोठय़ा प्रमाणावर घराबाहेर पडतील. मात्र, शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन गणेशोत्सवादरम्यान मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत महापालिका प्रशासनाने शहरातील खड्डे बुजवणे गरजेचे आहे.
– पंकज जाधव, नागरिक, ठाणे