Thane Animal Cemetery : ठाणे : ठाणे शहरात कुत्रे, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या पाळीव प्राण्यांना घरातील सदस्याइतकेच महत्त्वाचे स्थान प्राणीपालकांकडून देण्यात येते. परंतु, आजार, अपघात किंवा वयोमानामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा नसल्यामुळे प्राणी पालकांची मोठी अडचण होत होती. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने माजिवडा भागात पाळीव प्राण्यांची पहिली स्मशानभूमी उभारली आहे. ही प्राणी स्मशानभूमी नेमकी कशी आहे आणि तिथे प्राण्यांवर कसे होणार अंत्यसंस्कार याविषयी जाणून घेऊया.
गेल्या काही वर्षांमध्ये घरी प्राणी पाळण्याकडे कल वाढत आहे. अशा कुटुंबातील व्यक्तींना पाळीव प्राण्यांचा लळा लागतो. तसेच पाळीव प्राण्यांना घरातील सदस्यांचा दर्जा देण्यात येतो. या प्राण्यांचे आयुष्य साधारणपणे १२ ते १५ वर्षांचे असते. अशा पाळीव प्राण्यांच्या मृत्युनंतर कुटुंबातीलच सदस्य निवर्तल्याप्रमाणे कुटुंब शोकाकुल होते. पूर्वी अशा पाळीव प्राण्याच्या मृत्युनंतर सर्वसाधारणपणे घराच्या आजुबाजुस खड्डा करून त्यात पुरले जायचे. एकप्रकारे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जायचे.
वाढत्या शहरीकरणामुळे आता शहरात तशी जागा किंवा अंगण सहसा उपलब्ध नाही. यामुळे अशा पाळीव प्राण्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार व्हावेत, अशी मागणी प्राणी पालकांकडून होत होती. याचदरम्यान, मुक्या प्राण्यांसाठी एक स्वातंत्र स्मशानभूमी असावी अशी संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली आणि तशी सुचना त्यांनी ठाणे महापालिकेला केली होती. त्यानुसार, ठाणे महापालिकेने माजिवडा भागात पाळीव प्राण्यांची पहिली स्मशानभूमी उभारली असून तिचे लोकार्पण शनिवारी झाले.
अशी आहे प्राणी स्मशानभूमी
प्रति तास ५० किलो क्षमतेच्या पशुदाहिनीमध्ये प्रत्यक्ष पशु-प्राणी दहन करण्यात येईल. दहनामधून निर्माण होणारे वायू जलशुद्धीकरण यंत्रणा (वॉटर स्क्रबर) वापरून पाण्यातून गाळले व थंड केले जातील. त्यानंतर हे शुद्ध केलेले वायू वाहिनीद्वारे (डक्टिंग) ३० फूट उंच धुराड्यातून वातावरणात सोडले जातील. या प्रक्रियेसाठी ५००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांनी दिली.
असे होणार प्राण्यांवर अंत्यसंस्कार
पशुदाहिनीमध्ये मृत प्राणी ठेवण्यासाठी १ मीटर उंचीवरील दाह-शय्या (प्लॅटफॉर्म) व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे मृत पशु-प्राणी ठेवण्यात येईल. त्यानंतर पशुदाहिनीचा मुख्य दरवाजा बंद करून बर्नर सुरू केला जाईल. साधारणतः ९० मिनिटांत पशुदहन प्रक्रिया पूर्ण होईल. दहनावेळी दाहिनीचे तापमान सुमारे ८०० अंश सेल्सियसपर्यंत वाढविले जाईल.
ठाणे : ठाणे शहरात कुत्रे, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या पाळीव प्राण्यांना घरातील सदस्याइतकेच महत्त्वाचे स्थान प्राणीपालकांकडून देण्यात येते. परंतु, आजार, अपघात किंवा वयोमानामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार… pic.twitter.com/vuw6F1dfJZ
— LoksattaLive (@LoksattaLive) November 16, 2025
ही पशुदाहिनी केवळ गरज भासल्यासच सुरू करता येईल. अन्य वेळी ती बंद ठेवता येईल, ज्यामुळे अनावश्यक इंधनाचा अपव्यय टाळता येईल. कोणताही मृत पशू दहनासाठी आणल्यानंतर पशुदाहिनी प्रथम १० मिनिटे पूर्वतापनासाठी (प्री-हिटसाठी) सुरू केली जाईल. त्यानंतर, वरीलप्रमाणे त्या पशूचा दहनासाठी दाहिनीमध्ये स्वीकार केला जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय कदम यांनी दिली.
गॅस पशुदाहिनीचे वैशिष्ट्ये वापरण्यास सोपी आणि सुटसुटीत, प्रदुषण मुक्त, कमीतकमी निगा देखभाल, दुरूस्ती तसेच दुरूस्तीसाठी अत्यल्प कालावधी, इंधनाचा वापर केवळ पशुदहनावेळी होणार असून यामुळे अकारण इंधनाचा वापर नाही, अशी गॅस पशुदाहिनीचे वैशिष्ट्ये आहेत.
