सहा वर्षांपासून सुरू असलेले काम अपूर्ण अवस्थेतच
कल्याण रेल्वे स्थानकातून पूर्वेकडे जाण्यासाठी एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात येणारा स्कायवॉक प्रवाशांसाठी द्राविडीप्राणायाम ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्कायवॉकवरून गर्दी असलेल्या भागात उतरण्यासाठीची कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे याचा फटका कल्याण पूर्वेतील हजारो प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने नवा आराखडा रेल्वेकडे सादर करण्यात आला आहे. मात्र त्यासाठी परवानग्या आणि प्रत्यक्ष काम यासाठी आणखी एक वर्ष लागणार आहे. त्यामुळे पुढील वर्षभर येथील प्रवाशांना द्राविडीप्राणायामच करावा लागणार आहे.
कल्याण पूर्वेतील रेल्वे स्थानकाबाहेरील बराचसा भाग रेल्वे यार्डाच्या अखत्यारीत येत असून कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर सुमारे एक किमीपर्यंतचे अंतर कापून प्रवाशांना स्थानकाबाहेर जावे लागते. या अंतरामध्ये दोन भुयारी मार्ग ओलांडावे लागत असून काही ठिकाणी रेल्वे रूळ ओलांडावे लागतात. मात्र या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना नेहमीच अडचणींना तोंड द्यावे लागते. या पाश्र्वभूमीवर २००८ मध्ये कल्याण पूर्वेतील स्कायवॉकच्या कामाचे भूमिपूजन पूर्ण करण्यात आले. कल्याण यार्डातील सब-वे आणि त्यावरील ओव्हरहेड वायर यांचा विचार करता आत्तापर्यंत उभारण्यात आलेल्या सर्व स्कायवॉकपेक्षा हा उंच स्कायवॉक होणार हे निश्चित होते. त्यानंतर सुरू झालेले काम मंजुरी, तांत्रिक अडचणी आणि आराखडय़ातील गोंधळामुळे रखडून गेला होता. अखेर नव्याने या कामाला वेग देण्यात आला असून लवकर काम पूर्णत्वास येऊ शकणार आहे. हे काम पूर्ण होत असताना सर्वात गर्दीच्या भागात सॅटिस उतरवण्याकडे लक्ष देण्यात आलेले नसल्याने कोळसेवाडीसारख्या भागात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसू शकणार आहे. त्यामुळे सॅटिसने जाण्यापेक्षा जुन्या मार्गाने जाण्याकडे हे प्रवासी भर देण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण पूर्वेतील सॅटिस सध्या सम्राट अशोक नगरजवळ उतरत असून कोळसेवाडीतील नागरिकांसाठी जाणारी वेगळी मार्गिका सॅटिसला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोळसेवाडीतील गणेश मंदिराकडे जाणाऱ्या नागरिकांना त्याचा लाभ होऊ शकेल. सध्या रेल्वेच्या परवानगीसाठी हे प्रकल्प थांबले असून रेल्वेच्या परवानगीनंतर ही कामे पूर्ण होऊ शकतील. आधी हा प्रकल्प १२ कोटी रुपयांचा होता. त्यामध्ये नव्या गोष्टी समाविष्ट केल्याने हा खर्च १७ कोटींपर्यंत पोहोचला आहे.
– प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता

सर्वात उंच असलेला स्कायवॉक हा कोळसेवाडी परिसरातील नागरिकांच्या उपयोगाचा नाही. त्यामुळे या सॅटिसवरून चढण्यासाठी सरकत्या जिन्यांची गरज आहे. याशिवाय आवश्यक ठिकाणी उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्थाही करण्याची गरज आहे. तरच हा सॅटिस लोकांकडून वापरला जाऊ शकतो.
– एकनाथ सोनावणे, कल्याण</strong>

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane skywalk work not completed yet