अंबरनाथः अंबरनाथ शहराच्या प्रमुख रस्त्यांवर रस्ते अडवणाऱ्या अतिक्रमणांवर बुधवारी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई केली. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागातील अग्नीशमन दल मुख्यालय ते कोहोजगांव चौक, बी. केबीन रस्ता ते मोरीवली पाडा आणि मटका चौक ते फॉरेस्ट नाका या तीन प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम व हातगाड्या तसेचच पदपथावर असलेले अतिक्रमणे अंबरनाथ नगरपालिकेने हटवले. अनेक महिन्यांपासून ही कारवाई करण्याची मागणी नारिकांकडून केली जात होती.

गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात अतिक्रमणांनी डोके वर काढले होते. शहरातील सर्वच महत्वाच्या रस्त्यांवर दररोज अतिक्रमणे वाढत असल्याचे चित्र होते. शहरातील महत्वाचे आणि वर्दळीचे चौक फेरिवाल्यांच्या विळख्यात अडकल्याचे दिसत होते. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही होत होता. त्यामुळे या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. अंबरनाथ शहरातली कल्याण बदलापूर रस्त्यावर मटका चौक, विमको नाका, फॉरेस्ट नाका या चौकांमध्य हातगाड्या, खाद्यपदार्थ विक्रेते यांनी बस्तान मांडले होते.

अशीच परिस्थिती अंबरनाथ पूर्वेतील बी केबीन रस्त्यावरही होती. या ठिकाणीही विविध ठिकाणी फेरिवाले, विक्रेते यांचे अतिक्रमण झाले होते. पश्चिमेतील कोहोज गाव ते अग्नीशमन दलाचे मुख्यालय हा रस्ताही वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. याच मार्गावरून अंबरनाथहून कल्याण ग्रामीण, कल्याण अहिल्यानगर महामार्ग, टिटवाळा आणि माळशेज भागात येजा करता येते. या रस्त्यावरही अतिक्रमणे वाढली होती. मात्र या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप होत होता.

अखेर बुधवारी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानंतर अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख नरेंद्र संख्ये यांच्या नेतृत्वाखालीया तीन महत्वाच्या रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणांना काढण्यासाठी कारवाई करण्यात आली. सकाळी अकराच्या सुमारास भर पावसात पालिकेच्या जेसीबी यंत्र आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने मटका चौकापासून कारवाईला सुरूवात केली.

शहरातील सर्व नागरीकांना आणि व्यापारी वर्गाला आवाहन करण्यात येते की शहरातील मुख्य रस्त्यावर, पदपथावर अतिक्रमण करु नये. जेणेकरुन नागरीकांना येण्याजाण्यास अडथळा निर्माण होणार नाही. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. रस्ते, पदपथ मोकळे ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे. – उमाकांत गायकवाड, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका.