कल्याण- माजी कुलगुरू प्रा. अशोक प्रधान यांना मारहाण झालेल्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयापुढे चालवावा, या प्रक्रियेसाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी कल्याण शहर परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांकडून शासनाकडे केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपींना पकडण्यात येत नसल्याने पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एखाद्या किरकोळ प्रकरणातील आरोपी पोलीस तत्परतेने आठ, १२ तासांत पकडतात. मग या मारहाण प्रकरणात छत्रपती शिक्षण संस्थेतील बडतर्फ शिक्षक संजय जाधव यांच्या सोबत प्रा. प्रधान यांच्या बंगल्यात आलेल्या महिलेला, त्यांच्या सोबतच्या दोन मुलांना पकडण्यात पोलीस टाळाटाळ का करत आहेत, असे प्रश्न प्रधान मारहाण प्रकरणाने संतप्त झालेले नागरिक उपस्थित करत आहेत.

हेही वाचा – आता ‘धर्मवीर २’ चित्रपटातील दृश्य कापावे लागणार नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले स्पष्टीकरण

राज्याच्या गृह विभागाने या गंभीर प्रकरणात लक्ष घालावे. तपासी पोलिसांना या प्रकरणातील फरार तीन आरोपी तातडीने अटक करण्याचे आदेश देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींना झटपट अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करता यावे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे देण्यात आला आहे.

प्रा. प्रधान यांना पाठिंबा देण्यासाठी डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेतील शिक्षकांंनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला आहे. मात्र, प्रा. प्रधान यांचा ज्या शिक्षण संस्थेशी संबंध होता, त्या संस्थेने समर्थन सभेसाठी पटांगण उपलब्ध करून न देण्याची, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची भूमिका घेतल्याने कल्याणमधील एक वर्ग नाराजी व्यक्त करत आहे.

हेही वाचा – ठाणे : दिघा गाव स्थानक सुरू करा अन्यथा रस्त्यावर उतरू, खासदार राजन विचारे यांचा रेल्वेला इशारा

प्रा. प्रधान यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला कार्यक्रम रद्द केला असूनही रविवारी कल्याण शहर परिसरातील प्रा. प्रधान यांचे अनेक हितचिंतक स्वताहून नूतन विद्यालय परिसरात जमा झाले होते. कोणत्याही परिस्थितीत प्रधान प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका या मंडळींनी घेतली. प्रा. प्रधान यांच्या जगाच्या विविध भागांत नोकरी, व्यवसायानिमित्त स्थिरावलेल्या उच्चपदस्थ विद्यार्थ्यांनी प्रधान यांंना संंपर्क करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The case of former vice chancellor pradhan beating case should be conducted before fast track court questioning the police investigation ssb