भिवंडी येथील भोईवाडा भागात एका सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या भरतकुमार कोरी (३०) याला बुधवारी ठाणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता.

भिवंडी येथे पिडीत मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. २१ डिसेंबरला ती घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह तिच्या घराजवळील एका झुडूपांमध्ये आढळून आला होता. घटनास्थळी भोईवाडा पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता. त्यावेळी मृत्यूपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, भोईवाडा पोलीस ठाण्याचे तत्त्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांच्या पथकाने याप्रकरणाचा तपास करून मुलीच्या कुटुंबियांच्या ओळखीचा असलेला भरतकुमार कोरी याला ताब्यात घेतले होते आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली होती. भरतकुमार हा आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने मुलीला घराजवळून घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच हा प्रकार मुलगी घरी सांगेल म्हणून तिची दोनवेळा दगड डोक्यात टाकून हत्या केल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले.

बुधवारी हा खटला विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश कविता.डी. शिरभाते यांच्यासमोर आल्यावर सरकारी वकिलांनी सादर केलेले साक्षीदार आणि सादर केलेले पुरावे यांच्या आधारे भरतकुमार याला दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणात सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले. तर याप्रकरणाचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई डी. ए. नोटेवाड आणि पोलीस हवालदार व्ही.व्ही. शेवाळे यांनी काम पाहिले.