कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी चार तासाच्या कालावधीत दोन प्रवाशांचे महागडे मोबाईल फोन चोरट्यांनी गर्दीच्या वेळेत खिशातून काढून लांबवले आहेत. या चोरीप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या जवळील किमती ऐवज, मोबाईल चोरीच्या होणाऱ्या वाढत्या घटनांचा विचार करून कल्याण रेल्वे स्थानकात सातही फलाटांवर रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, लोहमार्ग पोलीस, कमांडो तैनात असतात. अनेक वेळा प्रवाशांचा ऐवज चोरणारे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून रेल्वे पोलीस झटपट पकडतात. चोरटे पकडले गेल्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकातील चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल, असे वाटत असतानाच पुन्हा नवीन चोर याठिकाणी सक्रिय होतात.

मंगळवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीजवळ एक प्रवासी आपला मोबाईल खिशात ठेऊन झोपला होता. या प्रवाशाची गाडी सकाळच्या वेळेत होती. त्यामुळे रात्री दीड ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान या प्रवाशाच्या खिशातील मोबाईल चोरट्याने मोठ्या कौशल्याने काढून घेतला आणि पळ काढला. संबंधित प्रवासी सकाळी आपल्या लांब पल्ल्याच्या गाडीची वेळ झाली म्हणून उठला. त्याने खिशात पाहिले तर मोबाईल फोन नव्हता. त्याने आजुबाजुला पाहिले पण कोठेही मोबाईल आढळला नाही. त्यामुळे चोरट्याने मोबाईल चोरल्याची खात्री पटल्यावर या प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

रात्रीची ही घटना घडल्यानंतर सकाळी कामावर जाण्यासाठी एक प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकात आला होता. त्याच्या जवळ त्याची कार्यालयाची पिशवी होती. लोकलमध्ये चढताना मोबाईल हातात नको म्हणून या प्रवाशाने हातामधील मोबाईल आपल्या विजारीच्या खिशात ठेवला होता. सकाळच्या वेळेत प्रवाशांनी तुडुंब भरलेले असते. कल्याण रेल्वे स्थानकात लोकल आल्यामुळे गर्दीतून प्रवासी लोकलमध्ये चढण्याच्या विचारात असताना चोरट्याने पाळत ठेऊन या प्रवाशाच्या खिशातील मोबाईल कौशल्याने काढून घेतला.

प्रवासी लोकल डब्यात चढल्यानंतर खिशातील मोबाईल शोधू लागला. तेव्हा त्याला मोबाईल खिशात नसल्याचे आढळले. त्याने लोकलमधून उतरून मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला पण डब्यात, आपण फलाटावर उभे होतो तेथेही मोबाईल आढळला नाही. डब्यातील इतर प्रवाशांना लोकलमध्ये चढताना कोणाला पडलेला मोबाईल सापडला आहे का असे प्रश्न केले. पण कोणीही अशाप्रकारे मोबाईल सापडला नसल्याचे प्रवाशाला सांगितले. त्यामुळे चोरट्यानेच हे काम केले असावे म्हणून प्रवाशाने लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही प्रवाशांचे फोन महागडे होते. हवालदार जगताप, साहाय्यक उपनिरीक्षक मोहिते याप्रकरणाचा तपास करत आहेत.