गर्दी कमी करण्यासाठी पालिकेची जनजागृती

ठाणे :  ठाणे महापालिकेने यंदा घरीच गणेशमूर्ती विसर्जनाकरिता नवी संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अमोनियम बायकाबरेनेट या रसायनाच्या माध्यमातून घरीच मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी प्रशासनाने शहरात जनजागृती सुरू केली असून विसर्जनासाठी वापरात आणल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर झाडांसाठी खत म्हणून केला जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट असून या पाश्र्वभूमीवर महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना घरीच मूर्तीचे विसर्जन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या भागातील सार्वजनिक मंडळांनाही परिसरातच विसर्जन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या विसर्जनासाठी नवी पर्यावरणपूरक संकल्पना पालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रशासनाने समाजमाध्यमांद्वारे जनजागृती सुरू केली आहे. अमोनियम बायकाबरेनेट या रसायनाच्या माध्यमातून घरीच मूर्तीचे विसर्जन करा आणि मूर्ती विसर्जन केलेल्या पाण्याचा वापर झाडांसाठी खतासाठी करा, अशा सूचना पालिकेने केल्या आहेत. ‘‘या पद्धतीमुळे पर्यावरणपूरक विसर्जन होऊन त्या पाण्याचा झाडांसाठी खत म्हणून वापर करता येईल. अमोनियम बायकाबरेनेट हे रसायन नागरिकांना घरपोच देण्याची तयारी शहरातील काही विक्रेत्यांनी दाखविली असून त्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत, असे ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले.

विसर्जनाची पद्धत

’ प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विसर्जित होईल अशा आकाराच्या पिंपात किंवा हौदात पाणी भरावे. त्यात मूर्तीच्या वजनाइतके  अमोनियम बायकाबरेनेट घालून ढवळून घ्यावे. ही प्रक्रिया करताना नाक-तोंड झाकलेले असावे.

’ निर्माल्य आणि सजावटीच्या वस्तू काढून मूर्तीचे त्या पाण्यात विसर्जन करावे. दर दोन ते तीन तासांनंतर हे पाणी ढवळावे. ४८ ते ७२ तासांत मूर्ती पूर्णपणे पाण्यात विरघळते आणि तळाशी कॅल्शियम कार्बोनेटचा थर जमा होतो.

’ त्यातील पाणी अमोनियम सल्फेट नावाचे अतिशय उच्च प्रतीचे खत म्हणून तयार होते. त्याचा झाडांसाठी वापर करता येतो.