२८ दिवसांमध्ये जिल्ह्यतील ४०४ गावांत एकही रुग्ण नाही; केवळ २७ गावे करोनामुक्त होण्याच्या प्रतीक्षेत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वा साडविलकर

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रशासकीय यंत्रणांमाफर्त राबविण्यात येत असलेल्या प्रभावी उपायांचे अनुकूल परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील ४०४ गावे करोनामुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यातील ४३१ पैकी ४०४ गावांत मागील २८ दिवसांत एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही. शहरीकरणाचा स्पर्श लाभलेली डोंबिवलीलगत असलेली २७ गावे करोनामुक्त झालेली नाहीत. ही गावे करोना मुक्त झाल्यास ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भाग १०० टक्के करोनामुक्त होणार आहे.   

ठाणे ग्रामीण भागातील करोना रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. चाचणी, उपचार, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि जनजागृती या बाबींवर ग्रामीण भागांत विशेष भर देण्यात येत असून या पंचसूत्री कार्यक्रमाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. ४३१ गावांपैकी ४०४ गावांत मागील २८ दिवसांत एकही करोना रुग्ण आढळून आलेले नाहीत. २७ गावांचा काही परिसर तसेच अंबरनाथ तालुक्यातील दोन, भिवंडीतील चार, कल्याण १२, मुरबाड पाच आणि शहापूरमधील चार गावे करोनामुक्त झालेली नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही गावे लवकरात लवकर करोनामुक्त व्हावेत याकडे जिल्हा परिषदेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातील करोनामुक्त गावात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रत्येक गावागावांत शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांच्यामार्फत नागरिकांमध्ये करोना नियमांचे पालन करण्याविषयीचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांची ताप तपासणी आणि प्राणवायू तपासणी करण्यात येते.

आतापर्यंत ठाणे ग्रामीण भागात २,९३८ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण भागात १७० रुग्णांवर उपचार सुरू असून त्यामध्ये अंबरनाथ २४, कल्याण ११३, भिवंडी १८, शहापूर १२ आणि मुरबाडमधील तीन रुग्णांचा समावेश आहे.

१६० गावांत एकही मृत्यू नाही

ठाणे ग्रामीण भागात एकूण १६० गावांत अद्याप एकही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील नऊ, भिवंडी २५, कल्याण १२, मुरबाड ७५ आणि शहापूरमधील ३९ गावांचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्यतील ग्रामीण भागात पाच सूत्री उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील करोनाचा प्रादुर्भाव अटोक्यात आला आहे. पाच सुत्री उपक्रमाचे काटेकोरपणे पालन करून उर्वरित २७ गावेही लवकरात लवकर करोनामुक्त करण्याचे जिल्हा परिषदेचे प्रयत्न आहेत.

– चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, ठाणे जिल्हा परिषद

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Towards thane corona mukti ysh